
अवसायकानेही संचालकांच्या पुढे एक पाऊल टाकत या मालमत्ता कवडीमोल विकल्या, अनेकांना फायदा मिळवून देत स्वत:ही कोटींचा घपला केला.
जळगाव : अकराशे कोटींच्या कथित बीएचआर घोटाळ्यात सध्या अवसायक जितेंद्र कंडारे, व्यावसायिक सुनील झंवर यांच्यासह मालमत्ता खरेदी करणारे खरेदीदार, मधले दलाल यांच्याभोवती चौकशीचा फास आवळला जात असला तरी, कोट्यवधींचे कर्ज थकविणाऱ्या कर्जदारांवर अद्याप काही कारवाई होताना दिसत नाही. कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करून थकीत कर्जाच्या वसुलीतून रकमा कधी मिळेल, या प्रतीक्षेत ठेवीदार आहेत.
आवश्य वाचा- पाडळसरे प्रकल्पासाठी ३५ कोटींचा निधी वितरित
भाईचंद हिराचंद रायसोनी या मल्टिस्टेट पतसंस्थेत तत्कालीन संचालक मंडळाने कोट्यवधींचे कर्जवाटप करत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला. अडीचशेवर शाखा असलेल्या या संस्थेतील गैरव्यवहारात राज्यात विविध ७० ते ८० ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल असून, अध्यक्ष प्रमोद ऊर्फ अंकल रायसोनींसह अन्य संचालक, अधिकारी अटकेत आहेत.
अवसायकांचे कारस्थान
दुसरीकडे पतसंस्था अवसायनात काढून संस्थेसह संचालक, कर्जदारांच्या मालमत्ता विकून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी अवसायकाची नियुक्ती करण्यात आली. मात्र, अवसायकानेही संचालकांच्या पुढे एक पाऊल टाकत या मालमत्ता कवडीमोल विकल्या, अनेकांना फायदा मिळवून देत स्वत:ही कोटींचा घपला केला.
चौघांवर फोकस
अवसायकांसह व्यावसायिक सुनील झंवर, ठेवीदार संघटनेचा नेता विवेक ठाकरे, सी.ए. महावीर जैन, धरम सांखला यांच्यावर चौकशीचा फोकस करण्यात आला आहे. कंडारे, झंवर अद्यापही फरारीच आहेत. मात्र, दुसरीकडे या पतसंस्थेतून लाखो, करोडोंचे कर्ज घेणाऱ्या कर्जदारांनी सर्व कर्ज थकवले आहे. अर्थात, काहींनी प्रामाणिकपणे कर्ज फेडलेही आहे. मात्र, थकबाकीदारांवर कारवाईची कुऱ्हाड अद्याप चाललेली नाही.
आवर्जून वाचा- श्वानासाठी ‘त्या’ने पत्करला गुन्हेगारीचा मार्ग
कर्जदारांच्या मालमत्तांचे काय?
पतसंस्थेने कर्जदारांना विनातारण खिरापतीसारखे कर्ज वाटले. आता जे थकबाकीदार आहेत, त्या कर्जदारांच्या मालमत्ता कधी जप्त होणार? हा प्रश्न ठेवीदारांकडून उपस्थित होत आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे