esakal | चौपदरीकरण पूर्णत्वाकडे; भुसावळ-जळगाव महामार्गावर वाहने सुसाट
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon bhusawal highway

चौपदरीकरण पूर्णत्वाकडे; भुसावळ-जळगाव महामार्गावर वाहने सुसाट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : जळगाव ते भुसावळदरम्यान (Jalgaon bhusawal highway) महामार्ग चौपदरीकरणाचे ८० टक्के काम पूर्ण होऊन महामार्गही वाहतुकीस खुला करण्यात आला. या मार्गावर वाहने सुसाट वेगाने धावत असल्याने मुंबई, पुणे महामार्गावरच आपण वाहने चालवीत असल्याचा ‘फील’ येत आहे. पूर्वी महामार्ग लहान असल्याने किमान एक तास भुसावळवरून जळगावला येण्यास लागत होता. आता किमान ३० ते ४५ मिनिटांत २५ किलोमीटर अंतर कापणे महामार्गच्या चौपदरीकरणामुळे शक्य झाले आहे. (jalgaon-bhusawal-fourway-and-bridge-work-complate)

जिल्ह्याच्या विकासात महामागाचे चौपदरीकरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गावाचा, जिल्ह्याचा विकास तेथील रस्ते कशा प्रकारे आहेत, दळणवळणाच्या सोयी कशा प्रकारे आहेत यावर अवलंबून असते. सध्या तरसोद ते चिखलीदरम्यान महामार्गाचे चौपदरीकरण पूर्णत्वाकडे आले आहे. सध्या रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाची, साइडचे रस्ते, दुभाजक टाकणे, उड्डाणपुलांवर पथदीप बसविणे यांची कामे वेगात सुरू आहेत.

हेही वाचा: योगासने ही व्‍यायाम म्हणून नाही करायची..; काय आहे योगा जाणून घ्या

मार्गावर येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी दोन वेगवेगळे प्रशस्त रस्ते आहेत, खड्डेही नाहीत, दोन-तीन ठिकाणी वळणे आहेत. कोठेही गाडी न थांबविता, खड्डे न लागता, स्पीडब्रेकरचा त्रास न होता अंतर अतिशय सुपरफास्ट वेगात पार करता येते आहे. यामुळे युवकांसह इतर नागरिक ‘धूम’स्टाइलने वाहने नेताना दिसतात.

जळगाव ते भुसावळचे महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. काही महिन्यांपासून महामार्गावरील नशिराबादपुढील सुनसगाव रेल्वेमार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू होते. ते नुकतेच पूर्ण होऊन एका भागाकडील पूल पूर्ण झाला आहे. त्यावरून वाहने ये-जा करण्यास सुरवात करण्यात आली आहे. दुसऱ्या पुलाच्या उभारणीचे काम सध्या सुरू आहे.

हेही वाचा: वाईट वृत्ती, लुटीची इच्छा अन् घोटाळ्याचा मार्ग

२०१८ मध्ये सुरवात

चिखली ते तरसोददरम्यान ६२.७ किलोमीटरचे अंतर आहे. या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या काम वेल्स्पन कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. गेल्या ऑक्टोबर २०१८ मध्ये चौपदरीकरणाच्या कामास मुक्ताईनगरपासून सुरवात माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे आदींनी केली होती.

वळणरस्ते ‘सेल्फी पॉइंट’

चकाचक रस्ते, पथदीपांचा लांबून दिसणारा आकर्षकपणा यामुळे वळणदार रस्त्यावर काही स्पॉट युवकांसाठी सेल्फी पॉइंट बनले आहेत. अनेक युवक सकाळी, सायंकाळी या वळणरस्त्यावर सुसाट वेगाच्या वाहनांसोबत आपले फोटोसेशन करतात, तर काही सिनेस्टाइल दुचाकीवर विविध प्रकारे पोझेस देत आहेत.

असा आहे टप्पा

तरसोद ते चिखली : ६२.७ किलोमीटर

अपेक्षित खर्च : ९४८ कोटी २५ लाख

मक्तेदार कंपनी : वेल्प्सन इन्फ्रास्ट्रक्चर

मुदत : १८ महिने (कोरोनामुळे ६ महिने मुदतवाढ आहे.)

loading image
go to top