शहरातील रस्ते दुरुस्तीचा कोट्यवधींचा खर्च गेल्या खड्ड्यात 

सचिन जोशी
Wednesday, 2 December 2020

गेल्या दोन वर्षांत तर वारंवार रस्त्यांची दुरुस्ती, म्हणजे तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. दोन वर्षांत तब्बल सात-आठ वेळा रस्ते दुरुस्तीचे काम झाले.

जळगाव : संपूर्ण शहरच खड्ड्यात गेल्यावर या खड्ड्यांना ठिगळ तरी कुठे लावणार, असा प्रश्‍न आहे. दुरुस्तीच्या नावाने केवळ ठेकेदार बनलेले नगरसेवक ‘गब्बर’ होत असून, रस्त्यांची दुरुस्ती मात्र तात्पुरत्या मलमपट्टीवर वारंवार केली जात आहे. त्यामुळे केवळ रस्ते दुरुस्तीवर होणारा कोट्यवधींचा खर्च खड्ड्यात जात आहे. 

आवश्य वाचा- जीवनात अनेक धक्के सहन केले, आता कंटाळा आलाय असे लिहत तरुणीने केली आत्महत्या -

‘अमृत’मुळे खोदून ठेवलेल्या चाऱ्यांची अद्याप ५ टक्केच दुरुस्ती झाल्याचे विदारक वास्तव समोर येत असून, या योजनेचे कामही जळगावकरांची अक्षरश: कसोटी पाहत आहे. जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था ग्रामीण भागापेक्षाही बिकट झाली आहे. ग्रामीण व शहरी भागाचे चित्र आज परस्परविरोधी आहे. तालुक्यातील खेड्यांमधील रस्ते चांगले व जळगावातील रस्ते चाळण झालेले अशी स्थिती आहे. 

तात्पुरती मलमपट्टी 
गेल्या काही वर्षांपासून महापालिकेतर्फे सातत्याने रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतल्याचे भासविले जाते. प्रत्यक्ष काम सुरूही होते. फूटभर मोठ्या खड्ड्यांमध्ये मुरूम, वेस्ट मटेरिअल टाकले जाते; परंतु त्याचा किंचितही उपयोग होत नाही, उलट धुळीचे प्रदूषण प्रचंड वाढल्याचे चित्र आहे. ज्या ठिकाणी डांबरीकरण करून खड्डे बुजविण्यात आले, त्याची तांत्रिक गुणवत्ता अत्यंत खालावलेली आहे. नवे बसस्थानक ते जिल्हा क्रीडासंकुलापर्यंतचा रस्ता त्याचे उत्तम उदाहरण. 

कोट्यवधींचा खर्च खड्ड्यात 
गेल्या दोन वर्षांत तर वारंवार रस्त्यांची दुरुस्ती, म्हणजे तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. दोन वर्षांत तब्बल सात-आठ वेळा रस्ते दुरुस्तीचे काम झाले. त्यावर जवळपास २३ कोटींचा खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्यक्षात रस्त्यांची दुरुस्ती कशी झाली, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे हा कोट्यवधींचा खर्च अक्षरश: खड्ड्यातच गेला आहे. 

आता पुन्हा नऊ कोटींचे बजेट 
गेल्या काही दिवसांपासून रस्ते दुरुस्तीची ओरड उठल्यानंतर महापालिका पदाधिकारी व प्रशासन काही प्रमाणात जागे झाले व रस्ते दुरुस्तीच्या निविदा काढण्यात आल्या. प्रभागनिहाय निविदांना चांगला प्रतिसादही मिळाला नाही. साडेनऊ कोटींची कामे आता मंजूर करण्यात आली असून, त्यासंबंधी कार्यादेशही देण्यात आले आहेत. दोन-तीन दिवसांत विविध प्रभागांमध्ये ही कामे सुरू होतील. 

नागरिकांनीच करावे ऑडिट 
आता नव्याने साडेनऊ कोटींच्या रस्ते दुरुस्तीची कामे सुरू होणार आहेत. मात्र, ही दुरुस्ती कशी होणार, हा प्रश्‍न आहे. पालिका प्रशासनाच्या दाव्यानुसार प्रमुख रस्त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार रस्ते दुरुस्ती होईल. प्रभागनिहाय प्रमुख रस्त्यांची व्याख्या वेगवेगळी आहे. ही दुरुस्ती तात्पुरत्या स्वरूपाची नाही. खड्डे तांत्रिकदृष्ट्या बुजून, त्यावर खडी व डांबराचा पॅच येईल. त्या-त्या प्रभागातील जागरूक नागरिकांनीही आपल्या भागातील रस्त्यांची दुरुस्ती कशी होतेय, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दुरुस्तीत काही त्रुटी असतील तर संबंधित नगरसेवक अन्यथा थेट महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार करणे गरजेचे आहे. तरीही दर्जा सुधारत नसेल तर नागरिकांनी प्रसारमाध्यमांना त्याबाबत कळवावे. 

 वाचा- जळगावमध्ये रुग्ण कमी तरी पॉझिटिव्हीटी रेट वाढता -
 

‘अमृत’च्या चाऱ्या राहणार तशाच 
सर्वाधिक रस्त्यांची दुर्दशा अमृत योजनेच्या कामाने केली आहे. जलवाहिनी टाकण्याचे ७० टक्के काम झाले असले तरी प्रत्यक्षात या वाहिन्यांसाठी खोदलेल्या चाऱ्यांची दुरुस्ती केवळ ५ टक्केच झाल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेने सध्या हाती घेतलेल्या रस्ता दुरुस्तीत अमृतने खोदकाम झालेल्या चाऱ्यांचा समावेश नाही. हे काम ‘अमृत’च्या मक्तेदारानेच करायचे आहे. मात्र, ते अत्यंत संथगतीने होत असून, त्याबाबत पालिका पदाधिकारी व प्रशासनाने पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. 

शहरातील सर्वच प्रभागांतील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे लवकरच सुरू होतील. त्यासाठी साडेनऊ कोटींच्या निविदा मंजूर करून कार्यादेश देण्यात आले आहेत. 
-अरविंद भोसले, शहर अभियंता 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Billions spent on road repairs in the last pit