दार उघड उद्धवा दार; जळगावात भाजपचा घंटानाद 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

राज्यातील मंदिरे शासनाने भाविकांच्या दर्शनासाठी त्वरीत खुली करावी; या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. त्याच अंतर्गत जळगावातही भारतीय जनता पक्ष व शहरातील विविध धार्मिक संघटनेतर्फे गोलाणी व्यापारी संकुलातील हनुमान मंदिरात घंटानाद करण्यात आला.

जळगाव : कोरोना महामारीमुळे गेल्‍या तीन- चार महिन्यांपासून मंदिरांचे दार बंद आहेत. देशात अनलॉक सुरू झाल्‍यानंतर टप्प्याटप्प्यात हॉटेल, मॉल्‍स सुरू झाली. मात्र मंदिर दर्शनासाठी खुले करण्याबाबत राज्‍य शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामुळे शासनाने मंदिरे त्वरीत उघडण्याच्या मागणीसाठी भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली जळगावात घंटानाद आंदोलन करण्यात आले. 

राज्यातील मंदिरे शासनाने भाविकांच्या दर्शनासाठी त्वरीत खुली करावी; या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. त्याच अंतर्गत जळगावातही भारतीय जनता पक्ष व शहरातील विविध धार्मिक संघटनेतर्फे गोलाणी व्यापारी संकुलातील हनुमान मंदिरात घंटानाद करण्यात आला. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हा महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, माजी आमदार गुरूमुख जगवानी, माजी महापौर ललीत कोल्हे, नगरसेवक राजू मराठे, माजी नगरसेवक सुनिल माळी यांच्यासह विविध धार्मिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. दार उघड उध्दवा..दार उघड अशा घोषणा देत घंटानाद केला. मंदिरे बंद ठेवण्याच्या शासनाच्या धोरणाचाही निषेध करण्यात आला. 

मंदिरेच का बंद
आमदार सुरेश भोळे म्हणाले, कि ‘कोरोना’सारख्या महामारीमुळे सर्वत्र क्षेत्रात लॉकडाऊन करण्यात आले होते. आता लॉकडाऊन उघडण्यात आले आहे. व्यापारी, उद्योग तसेच दारूदुकानेही सुरू करण्यात आली आहेत. मात्र शासनाने केवळ महाराष्ट्रातील मंदिरेच बंद केली आहेत. आता मंदिरे उघडावी ही आता हिंदु धर्मिंयांची भावना आहे. त्यामुळेच आज धार्मिक संघटनाचे प्रतिनिधीनी या ठिकाणी घंटानाद केला आहे. भारतीय जनता पक्षही त्यात सहभागी झाली असून भारतीय जनता पक्षाची हिच मागणी आहे. शासनाने सोशल डिस्टीशन ठेवून मंदिरे ही उघडावे हीच आमची मागणी आहे. त्यासाठी आजचे हे आंदोलन केले आहे. राज्यातील असंख्य हिंदु धर्मिय भाविकांच्या मागणी लक्षात घेवून शासनाने ही मंदिरे उघडावीत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bjp ghantanad aandolan in open temple