जळगाव मनपा स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजप सदस्यांमध्ये रस्सीखेच 

भूषण श्रीखंडे
Friday, 16 October 2020

पुन्हा भाजपत गटबाजीने डोके वर काढले आहे. भाजपच्या एका गटाने चक्क माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली.पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावून  कोणता गट यशस्वी होईल.  

जळगाव ः जळगाव महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी सत्ताधारी भाजपतील गटबाजीला उधाण आले आहे. सभापतिपद मिळविण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकला जात आहे. स्थायीचे पद जातीय समीकरणानुसार दिले जाणार का? पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावून आपल्याकडे भाजपचा कोणता गट यशस्वी होईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. 

स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांचा ३१ सप्टेंबरला कार्यकाळ संपल्याने स्थायी समिती सभापतिपद रिक्त झाले आहे. गेल्या स्थायी सभापती निवड प्रकरणी राजेंद्र घुगे-पाटील यांचे नाव जवळजवळ निश्‍चित झाले होते. परंतु ऐनवेळी भाजपच्या नेत्यांचा फोन येऊन सभापतिपदी ॲड. हाडा यांची निवड झाली होती. आताच्या सभापतिपदावर घुगे-पाटील यांची वर्णी लागणार असे निश्‍चित असताना पुन्हा भाजपत गटबाजीने डोके वर काढले आहे. भाजपच्या एका गटाने चक्क माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली. लेवापाटील समाजाच्या सदस्यांनीदेखील गिरीश महाजन यांची भेट घेऊन दबावतंत्र अवलंबले आहे. 

खडसेंमुळे मनपात राजकीय घडामोडी 
भाजपचे नाराज माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत जाणे जवळजवळ निश्‍चित झाले आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेतदेखील याचा परिणाम दिसू लागला आहे. दरम्यान, उपमहापौरपदाचा कार्यकाळ संपूनदेखील उपमहापौरांचा राजीनामा घेतला जात नसल्याची तक्रार लेवापाटील समाजाच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशावरूनदेखील महापालिकेत राजकीय घडामोडी होऊ लागल्या आहेत. 

२२ ला सभापती निवड 
रिक्त स्थायी समिती सभापती निवड प्रक्रियेबाबत महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार कार्यक्रम जाहीर झाला असून, २२ ला सकाळी अकराला स्थायी, तर दुपारी एकला महिला व बालकल्याण समिती सभापतींची निवडीची सभा होणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून अभिजित राऊत असतील. 

असा आहे निवड कार्यक्रम 
जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार १५ ते २० पर्यंत सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत अर्ज विक्री. २१ ला अर्ज स्वीकारणे, तर २२ ला सकाळी अकराला स्थायी सभापती निवड व दुपारी एकला महिला व बालकल्याण समितीच्या निवडीसाठी विशेष महासभा होणार आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bjp members are vying for the post of standing committee in Jalgaon Municipal Corporation