भाऊबीजेला बहीण-भावाने घेतले विष; बहिणीचा झाला मृत्यू, भाऊ रुग्णालयात 

रईस शेख
Tuesday, 17 November 2020

नैराश्‍यातून त्याने विष प्राशन केले, मात्र नातेवाइकांनी वेळीच त्याचा जीव वाचवत रुग्णालयात हलविले. त्याच दरम्यान दहा मिनिटांच्या अंतरानंतर त्याची लहान बहीण अस्विता हिने देखील घरा बाहेर जाऊन विषप्राशन केले.

जळगाव : भोलाणे(ता.जळगाव) टाळेबंदीच्या काळात घरी आलेल्या बहीण भावाच्या आयुष्यात भाऊबीजेची संध्याकाळ दुर्दैवी ठरली. संध्याकाळी साडेसात वाजेनंतर एकवीस वर्षीय भावाने नैराश्यातून विष घेण्याचा प्रयत्न केला तर बहिणीने दहा मिनिटाच्या अंतरानंतर विष घेऊन आत्महत्याचा प्रयत्‍न केला. उपचारानंतर तिचा मृत्यू झाला आहे. तर भाऊ उपचारार्थ दाखल आहे. 

वाचा- पोलिसांपासून लपण्यासाठी स्मशानभूमीत झोपला आणि काळाने त्याला दंश केला -

याबाबत तालुका पोलिस स्टेशनला बहिणीच्या मृत्यूबद्दल अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून भावाच्या विषबाधेच्या प्रकरणाची देखील नोंद घेण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गावातील सेवानिवृत्त एस.टी महामंडळातील वाहक विजय कोळी हे पत्नीसह राहतात.ते मुंबई येथे नोकरीला होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असून ते त्यांच्या उल्हासनगर, जि. ठाणे येथील घरी राहात होते. तीनही मुले शिक्षणासाठी उल्हासनगर येथे होती. त्यात विश्वजीत विजय कोळी (वय २१) हा आर्किटेक्टचे शिक्षण घेत होता तर, त्याचा मोठा भाऊ देवेश कोळी (वय २३), लहान बहीण अस्विता (वय १९) हे देखील त्याच्या सोबत राहत होते. टाळेबंदी सुरू झाली आणि त्यानंतर तिघेही भावडं उल्हासनगर येथून घरी भोलाणे येथे आले होते. 

काय..घडले भाऊबीजेला.. 
सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी पाडव्याचा आणि भाऊबीजेचा दिवस होता. विश्वजित अभ्यासात मन लागत नाही म्हणून तो निराश झाला होता. नैराश्‍यातून त्याने विष प्राशन केले, मात्र नातेवाइकांनी वेळीच त्याचा जीव वाचवत रुग्णालयात हलविले. त्याच दरम्यान दहा मिनिटांच्या अंतरानंतर त्याची लहान बहीण अस्विता हिने देखील घरा बाहेर जाऊन विषप्राशन केले. कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचा उपचारा अंती मृत्यू झाला. 

आवश्य वाचा- मुलांच्या कपड्यासाठी पैसे कमी दिले आणि विवाहितेने जीवनच संपविले
 

भावाचा नोंदवला जबाब 
तालुका पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती घेम उपचार घेणाऱ्या तरुणाचा जबाब घेतला. त्याने दिलेल्या जबाबमध्ये अभ्यासाच्या नैराश्यातून कृत्य करण्याचा प्रयत्न केला असे म्हटले आहे. मात्र त्याच्या बहिणीच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. मयत अस्विताच्या मंगळवारी शविच्छेदन होवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अधीक तपास सहाय्यक फौजदार साहेबराव पाटील करीत आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Brother and sister took poison, sister died, while brother was treated in hospital