वाहकाची आत्‍महत्‍या प्रकरण..त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निशाणा

देविदास वाणी
Monday, 16 November 2020

कोरोनाग्रस्त कालावधीतील (कै.) चौधरी यांना पुणे, औरंगाबाद, नाशिक, नवसारी व सोलापूरसारख्या लांबपल्ल्याच्याच कर्तव्यांवर पाठवून असंवेदनशील व भेदभावयुक्त वर्तन केले आहे.

जळगाव : जळगाव आगारातील एसटी वाहक (कै.) मनोज अनिल चौधरी यांनी ९ नोव्हेंबरला आत्महत्या केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांकडे (मुंबई) कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी केली. मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी पहिले मुख्य कारण ‘एसटीची कार्यपद्धती’ असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. 
(कै.) चौधरी यांच्याबाबतीत स्थानिक अधिकाऱ्यांनी हलगर्जी दाखवून इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेने जास्तीचे काम करून घेतल्याचे लक्षात आले आहे. ऑक्टोबरमध्ये जळगाव आगारात २५० पेक्षा जास्त वाहक व जवळपास २० चालक कम वाहक उपलब्ध असताना प्रत्येक वाहकास सरासरी प्रतिदिन प्रमाणे महिनाभरात दहा कर्तव्ये करणे गरजेचे असताना केवळ मनोज चौधरी यांच्याकडून २८ कर्तव्ये करून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
या कोरोनाग्रस्त कालावधीतील (कै.) चौधरी यांना पुणे, औरंगाबाद, नाशिक, नवसारी व सोलापूरसारख्या लांबपल्ल्याच्याच कर्तव्यांवर पाठवून असंवेदनशील व भेदभावयुक्त वर्तन केले आहे. या प्रकरणी एसटी महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होऊन कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याने जळगाव आगार व विभाग प्रशासनाने केलेल्या बेकायदेशीर व अन्यायकारक वर्तनाची चौकशी करण्यात यावी व संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे. 

जळगावमध्ये आज संयुक्त समितीची बैठक 
(कै.) मनोज चौधरी यांच्या आत्महत्येस सहा दिवस उलटून गेल्यावरही एसटी प्रशासनाने चौकशीच्या नावाखाली कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याचे जाणवल्याने जळगाव आगारात सोमवारी (ता.१६) संयुक्त कृती समितीची बैठक होणार आहे, अशी माहिती कामगार सेनेचे प्रसिद्धी सचिव गोपाळ पाटील यांनी दिली. बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bus conductor suicide case officer action