जळगावात फुलतेय पहिले ‘फुलपाखरू उद्यान’ 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

फुलपाखरू अत्यंत चित्ताकर्षक आणि नाजूकसा हा कीटक आपल्या रंगबिरंगी पंखांमुळे आणि त्याचबरोबर डौलदार उडण्याच्या लकबीमुळे लहान-थोर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. अतिशय आकर्षक असा हा कीटक परिसरात असणे म्हणजेच स्वस्थ पर्यावरणाचे द्योतक आहे.

जळगाव : रम्य हिरवळीवर विविधरंगी फुलपाखरांचा विहार मनमोहक असाच असतो... अशा या फुलपाखरांना कायमचा हक्काचा अधिवास मिळावा म्हणून पर्यावरण शाळा, शारदाश्रम आणि श्रीमती एस. एल. चौधरी इंग्लिश स्कूल येथे ‘फुलपाखरू उद्यान’ विकसित करण्यात येत आहे. 

फुलपाखरू अत्यंत चित्ताकर्षक आणि नाजूकसा हा कीटक आपल्या रंगबिरंगी पंखांमुळे आणि त्याचबरोबर डौलदार उडण्याच्या लकबीमुळे लहान-थोर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. अतिशय आकर्षक असा हा कीटक परिसरात असणे म्हणजेच स्वस्थ पर्यावरणाचे द्योतक आहे. पर्यावरणाचे संतुलन उत्तम राखण्यासाठी हे सुरेखसे फुलपाखरू अतिशय मोलाची भूमिका बजावत असते. 

फुलपाखरू महिन्याचे औचित्य 
सध्या सप्टेंबर हा ‘फुलपाखरू महिना’ म्हणून देशपातळीवर साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून जळगाव येथील न्यू कॉन्झर्व्हर आणि पुणे येथील नेमोफेलिस्ट आणि मुंबई येथील ख्यातनाम बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, वन्यजीव संवर्धन संस्था (जळगाव) या संस्थांतर्फे महाराष्ट्रातील प्रमुख शहरे व गावांमध्ये अनेक उपक्रम राबविले जात आहेत. 

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे ठिकाण
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत फुलपाखरांच्या अधिवासासाठी अनुकूल अशा वनस्पतींचे रोपण करून फुलपाखरांचे आकर्षित करणारे असे उद्यान बनविले जात आहे. दीड वर्षापासून शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त प्रयत्नाने तयार होत असलेले हे उद्यान जळगाव शहराच्या वैभवात नक्कीच भर घालेल, तसेच पर्यावरणप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे उत्तम ठिकाण म्हणून उपलब्ध होणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Butterfly garden develop environmental school