CA DAY : शर्ट, पॅन्ट, कोट शिवले.. जिद्दीने पूर्ण केले "सीए'; रवींद्र खैरनार यांची थक्क करणारी वाटचाल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

वडिलांचे मामेभाऊ असलेल्या काकांनी सूचना केली, ती मानून "सीए'चा अभ्यास सुरू करून ते पूर्णही केले.. 1993 ला मशिनवर शिवलेला कोट शेवटचा ठरला, त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.. सीए रवींद्र खैरनार यांचा हा अनुभव तरुणांसाठी प्रेरणादायी ठरावा.

जळगाव : आई- वडिलांसह दहा जणांचे कुटुंब... आई खानदेश मिलला कामगार, मिल बंद पडली आणि सुरू झाला संघर्ष.. वयाच्या नवव्या वर्षापासूनच मग पारंपरिक शिवणकामाच्या व्यवसायात गुंतलो.. शिक्षणही सुरू ठेवले. कामात आणि अभ्यासातही परिश्रम घेतले, त्यातून चांगले गुण प्राप्त केले.. व्यवसाय बघत असताना कॉमर्सची पदवी प्राप्त केली.. टायपिंग, स्टेनोही झालो.. वडिलांचे मामेभाऊ असलेल्या काकांनी सूचना केली, ती मानून "सीए'चा अभ्यास सुरू करून ते पूर्णही केले.. 1993 ला मशिनवर शिवलेला कोट शेवटचा ठरला, त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.. सीए रवींद्र खैरनार यांचा हा अनुभव तरुणांसाठी प्रेरणादायी ठरावा. 
खैरनार टेलर्स म्हणून त्यांचे जळगावात लौकिकप्राप्त दुकान होते. आई-वडील, बहिणी, काका-काकू असे दहा जणांचे एकत्रित कुटुंब असल्याचे सांगताना श्री. खैरनार म्हणतात, वयाच्या नवव्या वर्षापासूनच (सन 1974) मशिनवर कपडे शिवण्याला सुरवात केली. बालपणीच या पारंपरिक व्यवसायात तरबेज झालो, मात्र शिक्षणही सुरू ठेवले. बाजूच्या टायपिंग क्‍लासला काम करायचो, तिथे टायपिंग शिकलो. शॉर्टहॅन्ड शिकवायला एक सर यायचे, त्यांच्याकडून शॉर्टहॅन्डचे धडे गिरविले.. सोबतच वाणिज्य शाखेतून पदवीही प्राप्त केली. ही पदवी आणि स्टेनो अशा पात्रतेवर युनायटेड वेस्टर्न बॅंकेत तात्पुरती नोकरी लागली.. 1988 मध्ये ती नोकरीही गेली. शिवणकाम सुरूच होते. त्यावेळचे प्रसिद्ध सीए मधुकर जोशी आमच्याकडे कपडे शिवायला देत. त्यांना माझे काम आवडायचे, त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये स्टेनो म्हणून नोकरी दिली. यादरम्यान घरी वडिलांचे मामेभाऊ व त्यावेळच्या लोकसत्ताचे संपादक सुभाष सोनवणे घरी आले, त्यांनी "सीए' का करीत नाही? असा प्रश्‍न विचारत त्यासाठी प्रोत्साहन दिले. मधुकर जोशी यांच्याकडे सेवा करतानाच प्रचंड मेहनत घेतली आणि 1994 मध्ये सीए झालो. पुढे विश्‍वस्त संस्थांचे आयकर ऑडिट या विषयात पीएच.डी. प्राप्त केली. रनिंगचीही त्यांना विशेष आवड. मुंबई, दिल्ली, सातारा यासारख्या 12 मॅरेथॉन त्यांनी पूर्ण केल्यात. वयाच्या 55 व्या वर्षीही ते प्रत्येक मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ca day ravindra khairnar achivement