जळगावात येणारा गांजा येतोय हैदराबादहून  

रईस शेख
Wednesday, 26 August 2020

ट्रक पकडल्यानंतर देाघेही संशयित फरारी झाले. चालक मुक्तार पटेल यास बुधवारी (ता. २६) जिल्‍हा न्यायालयात हजर करण्यात आले.

जळगाव : हैदराबाद (आंध्र) येथून तस्करीच्या मार्गाने नारळाच्या झाडांमध्ये लपवून ३८ लाख १६ हजारांच्या गांजाची मुक्ताईनगरमार्गे खेप जळगावात आली होती. हा सर्व माल पाळधीत उतरवण्यापूर्वीच एमआयडीसी पोलिसांनी पकडला. चालकाने दिलेल्या माहितीवरून मेहरूणच्या सदाशिव नगरातील तीन संशयितांची नावे पुढे आली. गजाआड असलेला चालक मुक्तार याला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनवण्यात आली. 

एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी ट्रक (एमएच ४२ टी ९१२५) अडवून तपासणी केली असता त्यात गांजाची २४ पोती आढळून आली होती. तब्बल ३८ लाख १६ हजारांच्या गांजाच्या ट्रकसह चालक मुक्तार अब्दुल रहीम पटेल (वय २४, रा. लोहारा. ता. बाळापूर, अकोला) यास अटक झाली होती. चौकशीनंतर त्याने अरमान चिंधा पटेल, आशीक सुलेमान पटेल (दोन्ही रा. सदाशिवनगर, मेहरूण, जळगाव) आणि आसिफ पटेल अशी नावे सांगितली. आशीक पटेलच्या घरात अरमान भाडेतत्त्वावर राहतो. ट्रक पकडल्यानंतर देाघेही संशयित फरारी झाले. चालक मुक्तार पटेल यास बुधवारी (ता. २६) जिल्‍हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. सुवर्णा कुलकर्णी यांनी संशयितास सात दिवस पोलिस कोठडीचे आदेश दिले. ॲड. रंजना पाटील यांनी सरकारी पक्षातर्फे कामकाज पाहिले. 
 

संशयितांच्या घराची झडती 
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलाभ रेाहन, निरीक्षक विनायक लोकरे, अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, राजेंद्र कांडेलकर, दीपक चौधरी, सचिन पाटील, इम्रान सय्यद यांच्या पथकाने दुपारी सदाशिव नगरातील आशीक पटेल व अरमान पटेल यांच्या राहत्या घराची झडती घेतली. त्यात आक्षेपार्ह काहीही आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon The cannabis coming to Jalgaon is being smuggled from Hyderabad