अरेच्‍चा..म्‍हणे ‘अमृत’च्या चाऱ्यांचे ‘पॅच वर्क’ करारात नाही 

सचिन जोशी
Monday, 14 December 2020

जळगाव शहरात तीन वर्षांपासून ‘अमृत’ योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. विविध तीन प्रकारांतील जवळपास ६५० किलोमीटरच्या वाहिन्या याअंतर्गत शहरात टाकल्या जाणार असून, तीन वर्षांपासून सुरू असलेले हे काम मुदतवाढ देऊनही पूर्ण होऊ शकलेले नाही.

जळगाव : तीन वर्षांपासून सुरू असलेल्या ‘अमृत’ योजनेच्या कामामुळे संपूर्ण शहरातील रस्‍त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झालेले असून, या रस्त्यांची दुरुस्ती कधी होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत असताना ‘अमृत’संबंधी कामाच्या करारात मक्तेदाराने चाऱ्यांचे पॅच वर्क करून देण्याचा उल्लेखच नाही, असा दावा मक्तेदार एजन्सीकडून करण्यात आला आहे. 
दरम्यान, हा मुद्दा लक्षात आणून दिल्यानंतर दीड वर्षाने रस्ते दुरुस्तीसाठी कार्यादेश ‘अमृत’च्या मक्तेदारास दिला; परंतु त्यालाही दीड वर्ष पूर्ण होऊन दुरुस्तीच्या कामाने गती घेतलेली नाही. 

कामामुळे जनभावना तीव्र 
जळगाव शहरात तीन वर्षांपासून ‘अमृत’ योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. विविध तीन प्रकारांतील जवळपास ६५० किलोमीटरच्या वाहिन्या याअंतर्गत शहरात टाकल्या जाणार असून, तीन वर्षांपासून सुरू असलेले हे काम मुदतवाढ देऊनही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे शहरातील जवळपास सर्वच भागातील रस्ते या कामासाठी म्हणून खोदून ठेवल्याने या कामाबाबत जनभावना प्रचंड तीव्र झाल्या आहेत. 

दुरुस्ती नसल्याने रोष 
एकीकडे जलवाहिनी टाकल्यानंतर तो रस्ता तातडीने दुरुस्त करणे अपेक्षित असताना, तो तसाच राहात असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. केवळ वस्त्यांमधील नव्हे, तर शहरातील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. तर अमृतचे काम नसतानाही काही रस्त्‍यांची चाळण झाली आहे. त्यामुळे स्वाभाविकच अमृतच्या मक्तेदाराबद्दल नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. 

करारात दुरुस्ती नाहीच 
जैन इरिगेशनकडे या कामाचा मक्ता आहे. ‘अमृत’ प्रकल्पात पाणीपुरवठा योजनेचे १९० कोटींचे पहिल्या टप्प्यातील काम मक्तेदाराकडे असून, त्यात जलकुंभ उभारणे, जलवाहिन्या टाकून योजना पूर्ण करणे अंतर्भूत आहे. मात्र, प्रत्यक्षात या कामासंबंधी करारात जलवाहिनी टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मक्तेदाराने करावे, असा उल्लेखच नाही. त्यामुळे आतापर्यंत केवळ चारी खोदून झाल्यानंतर ती बुजण्याइतके काम एजन्सीद्वारे केले जात होते. 

दीड वर्षाने जाग 
दीड वर्ष हा प्रकार चालला व जळगावकर वेठीस धरले गेले. आता कुठे महापालिका प्रशासनाला याबाबत जाग आली असून, चारी खोदल्यानंतर तिच्यावर पॅच वर्कचे काम मनपाने जैन इरिगेशनला सोपविले आहे. अर्थात, मे २०१९मध्ये हे काम दिल्यानंतरही या कामाला गती आलेली नाही आणि रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. 

३० कोटींची तरतूद 
‘अमृत’मुळे खोदल्या जाणाऱ्या रस्त्यांतील चारी बुजण्यासाठी, त्यावर पॅच वर्कसाठी महापालिकेने मे महिन्यात नव्याने ३० कोटींची तरतूद केली. हे काम जैन इरिगेशनकडेच देण्यात आले आहे. मात्र, ‘अमृत’च्या कराराव्यतिरिक्त हे काम असल्याने पालिका प्रशासनाने त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. 
 
‘अमृत’संबंधी कामाच्या करारात कुठेही रस्तेदुरुस्ती अथवा चारीवर पॅच वर्कच्या कामाची तरतूद, उल्लेख नव्हता. मे-२०१९मध्ये या कामाबाबत नव्याने कार्यादेश देण्यात आले. त्यानुसार हे काम करण्यात येत आहे. 
-पी. एच. चौधरी, प्रकल्प अभियंता, अमृत योजना (जैन इरिगेशन) 

संपादन ः राजेश सोनवणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon city amrut yojna damage road no pach work in contract