esakal | जळगावमध्ये ७ ऑक्टोबरला राज्यस्तरीय कापूस परिषद
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton

जळगावमध्ये ७ ऑक्टोबरला राज्यस्तरीय कापूस परिषद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव : कापसाच्या नवीन वाणांची माहिती, कापूस पिकाच्या(Cotton Crop) उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना, नवीन तंत्रज्ञानाचा वापर (New technology) , यांत्रिकीकरण (Mechanization) व अन्य बाबींसंदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) जास्तीत जास्त माहिती व्हावी, यासाठी जागतिक कापूस दिनानिमित्त (World Cotton Day) येत्या गुरुवारी (ता. ७) कृषी विभागातर्फे एकदिवसीय राज्यस्तरीय कापूस परिषद (State Level Cotton Council) होणार आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा: जळगावः तरुणांना हटकल्याचा आला राग..चक्क पोलिसाला बेदम मारहाण


येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात होणाऱ्या या परिषदेत कापूस पिकासाठीचे तंत्रज्ञान, उत्पन्नवाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांसह इतर विषयांवर तज्ज्ञांची चर्चासत्रे व नावीन्यपूर्ण बाबींचे कृषी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. परिषदेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक शरद गडाख, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी, कापूस पैदासकार संजीव पाटील, वरिष्ठ कृषी विद्या शास्त्रज्ञ बी. डी. जडे, मोहीम अधिकारी पी. एस. महाजन, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ, महाबीज, जिनिंग प्रेसिंगचे प्रतिनिधी, खासगी बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा: भुजबळांच्या नावाने सुनील झंवरच्या मुलास फोन; फसवणूकीचा गुन्हा दाखल


या परिषदेला कृषिमंत्री दादा भुसे, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी सचिव, कृषी आयुक्त, तसेच राहुरी, परभणी व अकोला कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, राष्ट्रीय स्तरावरील कृषी संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी, कृषी निविष्ठा कंपन्यांचे प्रतिनिधी आदींसह औरंगाबाद, बुलडाणा, जालना, अकोला, नंदूरबार व धुळे या जिल्ह्यांतून निवडक शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

loading image
go to top