जिल्हा रुग्णालयाचा चमत्कार; झिंगलेले अकरा मद्यपींची वैद्यकीय तपासणी ‘निल’! 

रईस शेख
Wednesday, 18 November 2020

मद्यपींचा अवतार आणि उग्र दर्पावरूनच ते किती झिंगले आहेत याचा अंदाज येत होता. मात्र, वैद्यकीय तपासणी केल्यावर हे सर्व मद्यपी ‘निल’ असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केले.

जळगाव : मटण हॉटेलमध्ये मद्यप्राशन करताना ११ मद्यपींना सहाय्यक पोलिस अधीक्षकांच्या पथकाने अटक केली. बिअर बारचा परवाना नसताना हॉटेलमध्ये सर्रास मद्यपींची मैफल रंगल्याने ११ लोकांना ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय महाविद्यालय तथा जिल्‍हा सामान्य रुग्णालयात आणले. अक्षरशः डोलणाऱ्या मद्यपींना डॉक्टरांनी ‘निल’चे सर्टिफिकेट दिल्याचा चमत्कार घडला. 

आवश्य वाचा- भाऊबीजेला बहीण-भावाने घेतले विष; बहिणीचा झाला मृत्यू, भाऊ रुग्णालयात -

शहरातील नेरी नाक्याजवळील एसटी वर्कशॉपजवळ नारखेडे हॉटेलवर विनापरवाना व बेकायदा दारूची विक्री करणाऱ्या दोघांसह दारू पिणाऱ्या अशा ११ मद्यपींना सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, संदीप हजारे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मिलिंद सोनवणे, सुधीर साळवे व आरसीपी प्लाटून अशा पथकाने मध्यरात्री मद्यप्राशन करतेवळी ताब्यात घेतले होते. 

यांना घेतले ताब्यात 
बेकायदा मद्य विक्री करणारे नीलेश प्रभाकर भावसार (रा. कासमवाडी) आणि योगेश प्रकाश पाटील (रा. गोपाळपुरा) यांच्यासह बिअर बार नसताना मद्यप्राशन करणारे सुखलाल तुकाराम भिल (वय ३८), वणा राघो चव्हाण (३८, दोघे रा. उमाळा), सुभाष मधुकर पाटील (४९, रा. तुकारामवाडी), शशिकांत देवीदास पाटील (३०, रा. गोपाळपुरा), निखिल राजेश सोनवणे (२२, रा. कुसुंबा), संतोष नारायण बेडीकर (४९, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी), योगेश मोहन मर्दाने (३०), राजपुराण ढंढोरे (२४, दोघे रा. गुरुनानकनगर) आणि संतोष श्रावण वाघ (३८, रा. निफाड, जि. नाशिक). 

संपवा... संपवा लवकर..! 
हॉटेलमध्ये पोलिस आल्यावर काहींनी दारू लपवली, तर काही पेग रिचवत होते. सहाय्यक अधीक्षक चिंथा यांना बघितल्यावर मात्र पेग सोडून काही निघायला लागले. त्यावर पोलिसांनीच संपवा... लवकर पिऊन घ्या ते म्हणत दारू पितानाच पेग, दारूच्या बॉटलसह ताब्यात घेतले. 

आवर्जून वाचा- पोलिसांपासून लपण्यासाठी स्मशानभूमीत झोपला आणि काळाने त्याला दंश केला -
 

सिव्हिलचा चमत्कार... 
पोलिसांनी अटक केलेल्या ११ पैकी दोन वगळता उर्वरित सर्वच चालण्याच्या स्थितीतही नव्हते. डुलतच पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीला आणले. मद्यपींचा अवतार आणि उग्र दर्पावरूनच ते किती झिंगले आहेत याचा अंदाज येत होता. मात्र, वैद्यकीय तपासणी केल्यावर हे सर्व मद्यपी ‘निल’ असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केले. प्यायल्याचे सर्टिफाइड करा... नंतर न्यायालयातही साक्ष द्या, हा त्रास नको म्हणून जागेवरच ‘निल’ शेरा मारला जातो, त्यातला हा प्रकार, असेच म्हणावे लागेल. यावरूनच तत्कालीन सहाय्यक अधीक्षक डॉ. निलाभ रेाहन यांनी जिल्हा रुग्णालयाला यंत्रणेला धारेवर धरले होते, याची पुन्हा आठवण पोलिस विभागाला पुन्हा झाली. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Civil Hospital performed a miracle by reporting Neel to eleven drunkards