जळगावच्या आरटीओ कार्यालयात लाखोंचा अपहार ! 

रईस शेख
Monday, 9 November 2020

तब्बल ४१ वाहनांना हस्तलिखित बनावट आदेश तयार करून त्याच्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा बनावट शिक्का व खोटी स्वाक्षरी करून वाहनमुक्तीचे आदेश दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

जळगाव : उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी आणि वायुवेग पथकाने जप्त केलेल्या वाहनांना शासकीय दराप्रमाणे दंडाची आकारणी व त्याची ऑनलाइन नोंदणी करणे अपेक्षित असताना नागेश पाटील या लिपिकाने ई-चलन न फाडताच परस्पर बनावट वाहनमुक्तीचे आदेश तयार करून लाखो रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक प्रकाश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, कार्यालयातील लिपिक नागेश पाटील खटला विभागात कार्यरत आहेत. संपूर्ण राज्यातील कार्यालयांप्रमाणे या कार्यालयात कारवाई करण्यात आलेल्या वाहनांवर ई-चलन पद्धतीने ऑनलाइन दंड आकारणी बंधनकारक आहे. लिपिक नागेश यांच्या लॉग-इनद्वारे ती होते, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नोटिशीद्वारे गुन्ह्यातील प्रकरणांची छाननी होऊन अंतिम आदेश होऊन संगणकीय भरणा पावती देण्यात येते. असे असताना वायुवेग (भरारी) पथकांनी अटकवून ठेवलेल्या तब्बल ४१ वाहनांना हस्तलिखित बनावट आदेश तयार करून त्याच्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा बनावट शिक्का व खोटी स्वाक्षरी करून वाहनमुक्तीचे आदेश दिल्याचे निष्पन्न झाले आहे. कार्यालयात ही बाब निदर्शनास आल्यावर प्रकाश पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून नागेश पाटील यांच्याविरुद्ध शासकीय रकमेचा अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

असा अपहार-अशी रक्कम 
खटला विभागातील नागेश पाटील या लिपिकाने शासन नियमानुसार संबंधित ४१ वाहनधारकांकडून तीन लाख ३५ हजार ६०० रुपये दंडाची आकारणी करून ती कार्यालयातील रोखपालाकडे सुपूर्द करणे अपेक्षित होते. मात्र पाटील यांनी मांडवली करण्याच्या उद्देशाने बनावट आदेशान्वये केवळ ९७ हजार ५०० रुपये दंड वसूल करून तब्बल दोन लाख ३८ हजार १०० रुपयांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत अपहार केला आहे. 

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल 
कनिष्ठ लिपिक नागेश पाटील यांच्यासह मन्सूरखान मेहबूब खान, समाधान पाटील, भरत चौधरी, संजय पांडे, फकीर शहा, जगदीश माळी, अजितखान, शरीफ बागवान, सूर्यकांत कोळी, अशोक कोळी, प्रवीण हिलगोळे, वासुदेव बोबडे, रमेश भंगाळे, मोतीलाल दीक्षित, विनोद बडगुजर, सुनील गढे, बापू पाटील, विजयसिंग महाजन, यांच्यासह एजंट सुलतान बेग मिर्झा, गणेश ढेंगे अशा ३९ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon clerk misappropriated millions of rupees at the RTO office