जळगाव असो वा बिहार, कॉँग्रेसचा ‘आव’ जास्त अन् ‘जोर’ कमीच! 

कैलास शिंदे
Friday, 13 November 2020

निवडणूक आली की मित्रपक्षाशी तडजोड करताना जिल्ह्यातील नेते आम्ही ताकदवान असल्याचे दाखवीत असतात. आजच्या स्थितीत जळगाव जिल्ह्यात कॉँग्रेस बळकट नाही.

जळगाव ः बिहार निवडणुकीनंतर झालेल्या विश्‍लेषणात राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाच्या मार्गात कॉँग्रेस पक्षाचे अपयश कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. कॉँग्रेस पक्षाने बिहारमध्ये आपल्या क्षमतेपेक्षा अधिक जागा लढविल्या, परंतु यश मात्र गेल्या वेळेपेक्षाही कमी जागांवर मिळविले. जर या जागा तेजस्वी यादवांच्या पक्षाला दिल्या असत्या तर कदाचित चित्र बदलले असते, असे अनेकांचे मत आहे. कॉँग्रेसच्या बोलण्यात ‘आव’ जास्त असतो, परंतु प्रत्यक्षात रणांगणात ‘जोर’कमीच दिसून येतो. मग ते ‘जळगाव’ असो वा ‘बिहार’.

आवश्य वाचा- पाचही नगरसेवक म्हणतात, आमच्याकडे ‘ते’दस्तऐवज नाहीत ! 
 

आमचा राष्ट्रीय पक्ष आहे अशा आविर्भावात कॉँग्रेस पक्षाचे नेते असतात. निवडणुकीत त्याचा फटका या पक्षाला तर बसतोच परंतु मित्रपक्षालाही बसतो. मित्रपक्षासोबत कोणतीही तडजोड करण्यास पक्षाचे नेतृत्व तयार नसते. अगदी स्थानिक पातळीवरही पक्षाची हीच स्थिती असते. जळगाव जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या बाबतीतही हीच स्थिती दिसून आली. जळगाव जिल्ह्यात पक्षाची ताकद कमी आहे. निवडणूक आली की मित्रपक्षाशी तडजोड करताना जिल्ह्यातील नेते आम्ही ताकदवान असल्याचे दाखवीत असतात. आजच्या स्थितीत जळगाव जिल्ह्यात कॉँग्रेस बळकट नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि त्यानंतर कॉँग्रेसचा क्रमांक लागतो. कॉँग्रेस पक्षाचे नेते जिल्ह्यात पक्ष बळकट करण्याबाबत फारसे लक्ष देत नाहीत. महानगरात कॉँग्रेस पक्ष नसल्यासारखाच आहे. आज शहरात कॉँग्रेसच्या शाखा नाहीच, परंतु पक्षाला महानगराध्यक्षही नाही. अशीच स्थिती अनेक तालुक्यांतही आहे. 

पक्षाला ताकद देण्यासाठी पक्षाचे नेते प्रयत्न करीत नाहीत; परंतु पक्षाचे वरिष्ठ नेते जळगावात आल्यानंतर कॉँग्रेसचे स्थानिक नेते जिल्ह्यात पक्ष किती बळकट याची महती सांगत असतात. प्रत्यक्षात मात्र जमिनीवरचे चित्र वेगळेच असते. अगदी निवडणुकीत पक्षाच्या नेत्यांची स्वबळावर लढण्याचीही भाषा असते. अगदी दोन दिवसांपूर्वी कॉँग्रेस भवनात जिल्ह्याचे संपर्कमंत्री ॲड. के. सी. पाडवी आले होते. त्या वेळी स्थानिक नेत्यांनी अशाच वल्गना केल्या. अगदी जिल्ह्यात पक्ष कमकुवत असतानाही मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून पक्षाला ताकद देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असताना, तसे झाले नाही. आमचा कॉँग्रेस पक्ष मोठा आहे, आम्ही आजही मोठे आहोत या वल्गना कॉँग्रेसच्या नेत्यांनी सोडण्याची गरज आहे. त्याने पक्ष कमकुवत झाला आहे,

आवर्जून वाचा- कोरोनाने अनेकांना बनविले ‘वाहनमालक’! 
 

आपल्याला मित्रपक्षाच्या मदतीच्या सहाय्याने पुढे जाऊन पक्ष बळकट करावयाचा आहे, हेच ध्येय ठेवले तरच आगामी काळात कॉँग्रेसला चांगले दिवस येतील, अन्यथा बिहार असो किंवा जळगाव काँग्रेसला अपयश ठरलेलेच असेल. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon congress party is always trying to show more strength to the allied party