esakal | कोरोनाने अनेकांना बनविले ‘वाहनमालक’ !
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाने अनेकांना बनविले ‘वाहनमालक’ !

कोरोनाकाळात राज्य-केंद्र सरकारने सर्वांत प्रथम गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक दळणवळणाची साधने बंद केली. यातूनच स्वतःचे वाहन घेण्याची इच्छा बळावून दुचाकी वाहनांची विक्री अचानक वाढली.

कोरोनाने अनेकांना बनविले ‘वाहनमालक’ !

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात उपप्रादेशिक कार्यालयाचा महसूल शून्यावर आला होता. मात्र, जूनपासून अनलॉक सुरू झाले. ऑगस्टनंतर निर्बंध आणखी शिथिल झाले. नंतरच्या उत्सवाच्या काळात दसऱ्यापासून वाहन खरेदीने ‘टॉप गिअर’ घेतला. सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय बाजूला सारून सुरक्षित वाहतुकीसाठी अनेकांनी खासगी वाहनांना प्राधान्य दिल्याने विशेषत: चारचाकी वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. 

आवश्य वाचा- पीडित तरुणीच्या कुटुंबास आठ लाखाची मदत; पालकमंत्र्यांनी घेतली कुटूंबियांची भेट

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यासह देशभरात लॉकडाउन लागू झाला. तो जूनपर्यंत कायम होता. लॉकडाउन उठल्यानंतर ऑक्टोबरअखेरपर्यंत सार्वजनिक दळणवळण कार्यान्वित झाले नाही. नोव्हेंबर महिना उजाडल्यानंतरही रेल्वे, बस आणि खासगी वाहतूक सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. जनतेमध्ये अद्यापही कोरोना संसर्गाची भीती कायम असल्याने सहसा प्रवास टाळला जात आहे, तर अत्यावश्यक परिस्थितीतच सार्वजनिक दळणवळण साधनाचा उपयोग होत आहे. बस, रेल्वे आणि स्थानिक पातळीवरील प्रवासी साधनांचा वापर करण्याऐवजी आता स्वतःचे वाहन घेण्याकडे जनतेचा अधिक कल वाढल्याचे गेल्या दोन-तीन महिन्यांतील वाहन विक्रीचे आकडे पाहिल्यावर समोर येते. 

दिवसात ५७ लाखांचे उत्पन्न 
ऑक्टोबर महिन्यात रविवार सुटीचा दिवस असल्यावरही वाहन खरेदीचा उच्चांक राहिला. दसऱ्याच्या मुहूर्ताला एकाच दिवसात १६६ वाहनांची नोंदणी झाली. दसऱ्याच्या एका दिवसात रेकॉर्ड ब्रेक ५७ लाखांचे महसुली उत्पन्न जळगाव परिवहन विभागाला प्राप्त झाले. घटस्थापना आणि आता दोन दिवसांवर आलेल्या दिवाळीतही हा जोश कायम असण्याची शक्यता आहे. 

प्रत्येकाला हवे स्वतःचे वाहन 
कोरोनाकाळात राज्य-केंद्र सरकारने सर्वांत प्रथम गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक दळणवळणाची साधने बंद केली. यातूनच स्वतःचे वाहन घेण्याची इच्छा बळावून दुचाकी वाहनांची विक्री अचानक वाढली. सामान्यातील सामान्य माणूस दुचाकी खरेदीकडे वळला. मध्यमवर्गीय नोकरदार आणि छोट्या उद्योजकांनी फायनान्स करून चारचाकी वाहन खरेदी केले. 

वाचा- गहू, तांदुळ द्या अन्‌ घेवून जा हवे ते; दिवाळीमुळे मिळतोय फराळ
 

उत्पन्नाचा आलेख असा 
ऑगस्ट 

वर्ष २०१९ ः ८ कोटी ५२ लाख 
वर्ष २०२० ः ९ कोटी ८७ लाख 

सप्टेंबर 
वर्ष २०१९ ः ८ कोटी १० लाख 
वर्ष २०२० ः ९ कोटी ६३ लाख 

ऑक्टोबर 
वर्ष २०१९ ः १२ कोटी ५९ लाख 
वर्ष २०२० ः १३ कोटी ३५ लाख 

तुलनात्मक वाहन विक्री (१ जानेवारी ते ३० सप्टेंबर) 
वर्ष २०१९ ः २६ हजार ४०० (९ महिने) प्रत्येक महिन्यात सरासरी ३०० वाहने 
वर्ष २०२० ः २३ हजार २०० (६ महिने) प्रत्येक महिन्यात सरासरी ४०० वाहने 

कोरोना साथरोग आणि लॉकडाउनमुळे बाजारात आर्थिक मंदीचे वातावरण अद्यापही अंशतः कायम आहे. मात्र, असे असतानाही दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन विक्रीत वाढ झाली आहे. प्रत्येकालाच आता स्वतःचे वाहन असण्याची मानसिकता वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहन विक्रीने वेग धरला आहे. गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर झालेल्या वाहन विक्रीच्या तुलनेत यंदा जास्त विक्री झाली असून, वाहन नोंदणीतून रेकॉर्ड ब्रेक महसूल मिळाला आहे. 
- श्याम लोही, 
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, 
जळगाव 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image
go to top