राज्यात सत्तेत... पण जळगावमध्ये काँग्रेसला महानगराध्यक्ष सापडेना !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

जळगाव शहरात काँग्रेस कमकुवत असल्यामुळे या पदासाठी कोणीही व्यक्ती पक्षाच्या वरिष्ठांच्या नजरेत नसल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी वामसी रेड्डी यांच्याकडे ही जबाबदारी आहे.

जळगाव  : राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या काँग्रेसला जळगाव शहरासाठी सात महिन्यांपासून शहराध्यक्षपदासाठी व्यक्ती सापडत नसल्याची स्थिती आहे. 
राज्यात काँग्रेसचा सत्तेत सहभाग असला, तरी जळगाव शहरात पक्षाची स्थिती २० वर्षांपासून अत्यंत कमकुवत आहे. जळगाव महापालिकेत या पक्षाचा २० वर्षांत एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार असताना, जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती काहीअंशी बरी असली, तरी जळगाव शहरात मात्र काँग्रेसला फारशी ताकद मिळालीच नाही. त्यामुळे पालिका आणि आता महापालिका निवडणुकीतही काँग्रेसला साधा एक नगरसेवक निवडून आणता आलेला नाही. 

शहरात काँग्रेस कमकुवत असतानाही जिल्हा महानगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून डॉ. राधेश्‍याम चौधरी यांनी शहर काँग्रेसमध्ये जाण फुंकण्याचा प्रयत्न केला होता. महानगराध्यक्ष म्हणून त्यांनी नागरिकांच्या प्रश्‍नावर आंदोलने केली. काही भागात काँग्रेसच्या शाखाही सुरू केल्या होत्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या नेतृत्वाशी त्यांचा बेबनाव झाल्यामुळे त्यांनी काँग्रेसला राम राम करीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 

डॉ. चौधरी यांनी पक्ष सोडल्यानंतर जिल्हा महानगराध्यक्षपदाची जबबादारी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. राज्यात काँग्रेस सत्तेत भागीदार झाल्यानंतर पक्षाला ताकद मिळविण्यासाठी शहराध्यक्षपद नियुक्त केले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तब्बल सहा महिन्यांनंतरही काँग्रेसने शहराध्यक्षपदी कोणाचीही घोषणा केली नाही. 

जळगाव शहरात काँग्रेस कमकुवत असल्यामुळे या पदासाठी कोणीही व्यक्ती पक्षाच्या वरिष्ठांच्या नजरेत नसल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी वामसी रेड्डी यांच्याकडे ही जबाबदारी आहे. त्यांनीही अद्याप कोणाचेही नाव दिले नसल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच राज्यातील काही जिल्ह्यांतील जिल्हा व महानगराध्यक्ष घोषित केले. त्यांनी जळगाव शहरासाठीही जिल्हा महानगराध्यक्षपदासाठी नावे मागविली होती. मात्र, त्यांच्याकडे नावेच गेली नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हा महानगराध्यक्षपदासाठी काँग्रेसला प्रभावी व्यक्ती हवी असून, सद्यःस्थितीत कोणतेही नाव समोर येत नसल्याने हे पद रिक्त आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या कोणत्याही पक्षाच्या शहराध्यक्षपदासाठी अक्षरश: रस्सीखेच सुरू असते. जळगावात मात्र काँग्रेस महानगराध्यक्षपदासाठी पक्षाला व्यक्ती मिळत नसल्याची शोकांतिका आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Congress in the state In power but city President not found