आईची भेट घेवून निघालेल्‍या ठेकेदाराचा अपघाती मृत्‍यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

कानसवाडी (ता. जळगाव) येथे विलास सोनवणे यांची आई राहते. आईला भेटण्यासाठी ते गेले हेाते. आई व गावातील इतर परिचयातील लोकांची भेट घेत निरोप घेवून ते पहाटेच कानसवाडी येथून निघाले होते.

जळगाव : आईला भेटून पुन्हा जळगाव घराकडे परतणाऱ्या बांधकाम ठेकेदार विलास बंडू सोनवणे (वय 55) मूळ रा. कानसवाडी ता.जि.जळगाव, ह.मु. रामानंदनगर याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्‍यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी पावणेनऊच्या सुमारास हॉटेल गौरवजवळ घडली आहे. 

कानसवाडी (ता. जळगाव) येथे विलास सोनवणे यांची आई राहते. आईला भेटण्यासाठी ते गेले हेाते. आई व गावातील इतर परिचयातील लोकांची भेट घेत निरोप घेवून ते पहाटेच कानसवाडी येथून निघाले होते. नशिराबाद येथे कामाच्या ठिकाणी जावून येथून काम आटोपून जळगावला येत असताना शहराजवळील हॉटेल गौरव जवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात त्‍यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत विकास सोनवणे यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी आणि पत्नी, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आईला काही क्षणात मुलाचा निरोप
आईची भेट घेवून निघालेल्‍या विलास सोनवणे यांचा अपघाती मृत्‍यू झाला. तिकडे मुलगा भेटून गेला म्‍हणून आनंदात होती. घरून निघालेल्‍या मुलाच्या मृत्‍यूचा निरोप अवघ्‍या काही तासात मिळाल्‍याने आईला धक्‍काच बसला. निरोप एकून विलास यांच्या आईने एकच हंबरडा फोडला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon contractor death in road accident