
आठवड्यापासून पुन्हा रुग्णसंख्या काही प्रमाणात घटू लागल्याने ॲक्टिव रुग्णांची संख्याही काहीशी कमी झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यात ५०३ अॅक्टिव रुग्ण होते.
जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्या घटू लागली असून ॲक्टिव रुग्णांची संख्या थोडी कमी होत आता पाचशेच्या टप्प्यात आली आहे. दुसऱ्या लाटेच्या शक्यतेत रुग्णसंख्या मर्यादित राहत असल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळत आहे.
आवश्य वाचा- जळगाव जिल्ह्यात कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस आक्रमक
दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट तीव्र स्वरुपात येण्याची शक्यता व्यक्त होत होती. दिवाळीनंतरच्या आठवड्यात रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढतही होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून नवे बाधित तुलनेने पुन्हा कमी आढळून येत आहेत. गुरुवारी प्राप्त अहवालात ४० नवे बाधित आढळून आले. त्यामुळे रुग्णसंख्या ५४ हजार ६८३वर पोचली. तर ४८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण बरे होणाऱ्यांची संख्या ५२ हजार ८७८ झाली आहे. गेल्या २४ तासांत एकही मृत्यू झालेला नाही.
आठवड्यापासून पुन्हा रुग्णसंख्या काही प्रमाणात घटू लागल्याने ॲक्टिव रुग्णांची संख्याही काहीशी कमी झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यात ५०३ अॅक्टिव रुग्ण होते. त्यापैकी केवळ १६५ रुग्णांमध्ये लक्षणे असून उर्वरित ३३८ रुग्ण लक्षणे नसलेली आहेत.
वाचा- उद्योजकांसाठी चांगली बातमी: जळगावात ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक कार्यालय स्थापन होणार
नऊ तालुक्यांत नवा रुग्ण नाही
गुरुवारच्या अहवालानुसार जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण, चोपडा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, पारोळा, मुक्ताईनगर या ९ तालुक्यांत नवा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तर जळगाव शहरात १६, भुसावळला १३, अमळनेर ३, चाळीसगाव ५, जामनेर, रावेर व बोदवड तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला.
संपादन- भूषण श्रीखंडे