
जळगाव जिल्हा औद्योगिकदृष्ट्या मागास असल्याने उद्योजकांना सवलती मिळत नाहीत. यामुळे जळगाव औद्योगिक वसाहतीचा दर्जा हा डी वरून डी प्लस करावा अशी मागणी करण्यात आली.
जळगाव : जळगावात महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळ अर्थात ‘एमआयडीसी’ चे प्रादेशिक कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्याला मान्यता दिली आहे. अशी माहिती जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे उद्योजकांची बैठक घेऊन यात त्यांना भेडसावणार्या समस्या जाणून घेत, याचे तातडीने निराकरण करण्याची ग्वाही दिली होती. या अनुषंगाने आज मंत्रालयात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक घेतली. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह उद्योजकांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
याबाबत माहिती देतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले, कि ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक कार्यालय धुळे येथे असल्यामुळे जळगावच्या उद्योजकांना खूप अडचणी येतात. परिणामी जळगाव येथे हे कार्यालय सुरू करावे अशी मागणी आपण केली. यावर उद्योगमंत्र्यांनी संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत हा विषय घेऊन अतिरिक्त प्रादेशिक अधिकारीपद निर्मित करण्याचा व यात जळगावचा समावेश करण्याला मान्यता दिली. परिणामी हा महत्वाचा विषय आता मार्गी लागणार आहे. जळगाव जिल्हा औद्योगिकदृष्ट्या मागास असल्याने उद्योजकांना सवलती मिळत नाहीत. यामुळे जळगाव औद्योगिक वसाहतीचा दर्जा हा डी वरून डी प्लस करावा अशी मागणी करण्यात आली. यावर उद्योगमंत्र्यांनी याबाबतच्या शासन आदेशात दुरूस्ती करून ‘धुळे’ ऐवजी‘उत्तर महाराष्ट्र’ असा उल्लेख करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिलेत. यामुळे जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांना आता सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ट्रक टर्मिनर होणार
जळगावातील ट्रक टर्मिनस बाबत माहिती देतांना गुलाबराव पाटील यानी सांगितले, कि जळगावच्या अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये ट्रक टर्मिनससाठी भुखंड आरक्षित करण्यात आला असून येथे टर्मिनस उभारण्यात यावे अशी मागणी केली. यावर ट्रक टर्मिनसचा प्रस्ताव महामंडळाच्या धोरणानुसार दोन महिन्यात सादर करण्यात यावा असे निर्देश उद्योगमंत्र्यांनी दिले.
वाचा- शेतात रात्री कामासाठी तरुण निघाला आणि काळरुपी ट्रॅक्टर त्याच्या अंगावरून गेला
तालुक्यात ‘एमआयडीसी’ उभारणी
जिल्हयात काही तालुक्यात ‘एमआयडीसी’उभारण्याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती देवून गुलाबराव पाटील यांनी सांगितले, कि बैठकीत धरणगाव येथे मोठ्या प्रमाणात जिनींग व प्रेसींग उद्योग असल्याने येथे एमआयडीसीची उभारणी करण्यात यावे अशी मागणी केली. यावर तालुक्यातील मौजे जांभोरा येथील शासकीय जमीन ताब्यात घेऊन औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उद्योग मंत्र्यांनी दिली. याच्या सोबत आजच्या बैठकीत पाचोरा-भडगाव, मुक्ताईनगर, चोपडा येथे औद्योगिक क्षेत्राची उभारणी करावी. जळगाव येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारावे या मागण्यांनाही सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे. यावेळी आमदार किशोर पाटील, आ. चंद्रकांत पाटील, आ. अनिल पाटील, एम. आय.डी. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अंबलगन व उद्योग विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
संपादन- भूषण श्रीखंडे