esakal |  केंद्राने संसर्ग, मृत्यूदर कमी करण्याचे दिले ‘टार्गेट’, उपाययोजना सुरू 
sakal

बोलून बातमी शोधा

 केंद्राने संसर्ग, मृत्यूदर कमी करण्याचे दिले ‘टार्गेट’, उपाययोजना सुरू 

दुर्दैवाने उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार वगळता सर्व म्हणजे नाशिक, नगर, जळगाव व धुळे या चारही जिल्ह्यांचा समावेश आहे. नाशिक शहर व जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे.

 केंद्राने संसर्ग, मृत्यूदर कमी करण्याचे दिले ‘टार्गेट’, उपाययोजना सुरू 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव  : संसर्गाचा वेग आणि देशाच्या मृत्यूदरापेक्षा अधिक मृत्यूदर म्हणून सर्वाधिक प्रभावित ठरलेल्या देशभरातील ३५ जिल्ह्यांमध्ये दुर्दैवाने जळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. गेल्या ३७ दिवसांतच २० हजारांवर रुग्ण वाढून संख्या ३३ हजारांवर पोहोचली आहे, तर बळींची संख्याही नऊशेच्या टप्प्यात आहे. त्यामुळे केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने संसर्ग रोखण्यासह मृत्यूदर कमी करण्यासंबंधी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून रोज कोरोना स्थितीचा आढावा घेतला जात आहे. यात दोन दिवसांपूर्वीच देशातील सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांमधील स्थितीवर चर्चा झाली. 

३५ जिल्हे प्रभावित 
कोरोना संसर्गाचा वेग, त्यामुळे होत असलेली रुग्णवाढ, गंभीर व अतिगंभीर रुग्णांचे प्रमाण व मृत्यूदर, अशा विविध निकषांवर देशभरातील ३५ जिल्हे सर्वाधिक प्रभावित म्हणून निश्‍चित करण्यात आले. यात सर्वाधिक १७ जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्यात दुर्दैवाने उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार वगळता सर्व म्हणजे नाशिक, नगर, जळगाव व धुळे या चारही जिल्ह्यांचा समावेश आहे. नाशिक शहर व जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे, त्यातुलनेत जळगाव जिल्हा लहान असूनही संसर्ग झपाट्याने वाढतोय. 

अशी आहे स्थिती 
जिल्ह्यात गेल्या ३७ दिवसांत २० हजार रुग्ण वाढले. सोबतच महिनाभरातच बळींच्या संख्येत तीनशेने भर पडली. साडेपाच लाख लोकसंख्येच्या जळगाव शहरात साडेसात हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. चाळीसगाव, अमळनेर, भुसावळ, चोपडा, पारोळा यांसारखी शहरे ‘हॉटस्पॉट’ झाली असून, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील ३५ जिल्ह्यांप्रमाणेच जळगाव जिल्ह्यातही केंद्र सरकारने विशेष उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. 

असे आहेत निर्देश 
- कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे 
- रुग्ण लवकर शोधून उपचार करणे 
- रुग्ण गंभीर होण्यापूर्वी त्यांना दाखल करणे 
- गंभीर रुग्णांसाठी आवश्‍यक सुविधा पुरविणे 
- संसर्ग रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी 
- ऑक्सिजन, आयसीयू, व्हेटिलेटरची उपलब्धता करणे 

जिल्ह्यात संसर्गाचे प्रमाण वाढतेय, हे खरे आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आपण ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर देऊन चाचण्या वाढविल्या आहेत. त्यामुळे नवे रुग्ण समोर येत आहेत. रुग्णांना शोधून तातडीने उपचार सुरू करणे त्यामुळे शक्य होत आहे. सोबतच वैद्यकीय सुविधांची उपलब्धताही सज्ज ठेवली जात असून, त्याद्वारे मृत्यूदर कमी करण्यावर आपला भर आहे. 
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव 

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे निर्देश मृत्यूदर कमी करण्यासंबंधी आहेत. सुरवातीच्या टप्प्यात जिल्ह्यातील मृत्यूदर तब्बल १३ टक्के होता. तो २.६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यश आले आहे. देशाची सरासरी त्यापेक्षाही कमी असून, त्याबरोबरीने मृत्यूदर कमी करण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी उपाययोजना व प्रयत्न सुरू आहेत. 
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी  

संपादन- भूषण श्रीखंडे