रुग्णसंख्या घटतेय तरी जळगाव जिल्ह्यात संसर्ग अद्याप नियंत्रणाबाहेर ! 

सचिन जोशी
Thursday, 10 December 2020

जिल्ह्यातील रुग्ण सापडण्याची ‘पॉझिटिव्हिटी’ म्हणजे दर १०० चाचण्यांमागे आढळून येणारे रुग्ण याचे प्रमाण जवळपास १६ टक्के आहे.

जळगाव : दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होऊन नव्या बाधितांची संख्या घटत असली तरी आत्तापर्यंत झालेल्या एकूण चाचण्या व त्या तुलनेत रुग्णांची संख्या बघता पॉझिटिव्हिटी रेट १६ टक्के आहे. त्यामुळे संसर्ग अद्यापही नियंत्रणात आला नसल्याचे मानले जात आहे. 

आवश्य वाचा-  ग्रामपंचायत निवडणूक : मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस 
 

देशाला लॉकडाउनच्या गर्तेत टाकणाऱ्या व दीड लाखावर बळी घेणाऱ्या कोरोनातून अद्यापही पूर्णपणे मुक्ती मिळालेली नाही. जळगाव जिल्ह्यातही कोरोनामुळे आठ महिन्यांत तेराशेपेक्षा अधिक बळी गेले असून, ५४ हजारांवर रुग्ण त्यातून गेले आहेत. सप्टेंबरमध्ये तब्बल दहा हजारांवर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या गेल्यानंतर १७ सप्टेंबरपासून कोरोनाचा आलेख खाली येऊ लागला आहे. 

दोन महिन्यांत दिलासा 
दोन-अडीच महिन्यांत जिल्ह्याला कोरोना संसर्गाच्या तीव्रतेतून दिलासा मिळाला. सप्टेंबरच्या मध्यांतरापासून सातत्याने रुग्णसंख्या कमी होत गेली. दिवाळीनंतर पुन्हा रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी भीती होती. मात्र, नव्याने बाधित रोजच्या रुग्णांमध्ये अल्प वाढ झाल्याचे दिसून आले. 

वाचा- जामनेरला राडा; कापुस खरेदी केंद्रावर टोकन देताना वशिलेबाजी* 

 पॉझिटिव्हिटी जास्तच 
असे असले तरी आत्तापर्यंत झालेल्या चाचण्यांच्या तुलनेत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या बघता जिल्ह्यातील रुग्ण सापडण्याची ‘पॉझिटिव्हिटी’ म्हणजे दर १०० चाचण्यांमागे आढळून येणारे रुग्ण याचे प्रमाण जवळपास १६ टक्के आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत तीन लाख ५२ हजार ९७३ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ५४ हजार ८७२ रुग्ण आढळले. 

 
पॉझिटिव्हिटी रेट कमी 
दोन महिन्यांपासून मात्र चाचण्यांच्या तुलनेतील पॉझिटिव्हिटी रेट पाच- सहा टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. सध्या रोज सात- आठशे चाचण्या होत असून, त्यापैकी सरासरी ३० ते ४० रुग्ण आढळत आहेत. 

 

आवश्य वाचा- वऱ्हाडीच्या अंगावर खाजेची वस्तू टाकून लाखोच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला 
 

संसर्ग नियंत्रणात का नाही? 
सध्या रुग्णसंख्या कमी आढळून येत असली तरी संसर्ग नियंत्रणात आल्याचे म्हणता येत नाही. ज्यावेळी एकूण चाचण्यांच्या तुलनेत आढळून आलेल्या रुग्णांचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा खाली येते, तेव्हा संसर्ग नियंत्रणात आहे, असे मानले जाते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सध्या त्यावर लक्ष दिले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी ‘सकाळ’ला सांगितले.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona infection is still out of control in jalgaon district