जळगावचा आकडा पाच हजार पार...सलग तिसऱ्या दिवशी द्विशतक  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आज सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्येने दोनशेचा आकडा गाठला. आज दिवसभरात २०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,

जळगाव  : सलग तिसऱ्या दिवशी नव्या कोरोना बाधितांच्या आकड्याने द्विशतक गाठले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला असून दिवसभरातील ८ मृत्यूंनी जिल्ह्यातील मृत्यूसंख्यावर तीनशेवर पोचली आहे. दिवसभरात १५५ रुग्ण बरे झाले असून बरे होणाऱ्यांची संख्याही आता तीन हजारांच्या जवळ पोचली आहे. 
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आज सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्येने दोनशेचा आकडा गाठला. आज दिवसभरात २०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यामुळे एकूण आकडा ५०१० एवढा झाला. आज सर्वाधिक ३९ रुग्ण अमळनेर येथील असून त्याखालोखाल ३० रावेरचे आहेत. आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३०१वर पोचली आहे. आज मृत्यू झालेल्या सर्व रुग्ण पन्नाशी पार केलेले आहेत. 

आज आढळून आलेले रुग्ण 
अमळनेर ३९, रावेर ३०, धरणगाव २३, एरंडोल १८,मुक्ताईनगर १६, भुसावळ ८, जळगाव ग्रामीण ७, चोपडा १८, पाचोरा १०, बोदवड ६, चाळीसगाव ३, पारोळा १, जामनेर १, यावल ३. 

जळगावात २२ रुग्ण 
मंगळवारी तब्बल ९७ नवे रुग्ण आढळून आलेल्या जळगाव शहरात आज थोडा दिलासा मिळाला. दिवसभरात शहरात २२ रुग्ण आढळून आलेत. विशेष म्हणजे जळगावात आज आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची (३९) संख्या जास्त आहे. तर जिल्ह्यात दिवसभरात १५५ रुग्ण बरे झाले. जिल्ह्यात आतापर्यंत २९८३ रुग्ण बरे झाले असून सद्य:स्थितीत जिल्ह्यात १७२६ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. 

एरंडोलला १३ रुग्णांची कोरोनावर मात 
एरंडोल : शहरातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या १३ रुग्णांनी ‘कोरोना’वर मात केली तर दोन दिवसांत १९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे रुग्णसंख्या २६० वर पोहचली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालात फरकांडे येथील चार रुग्णांचा समावेश आहे, तर शहरातील सय्यद वाडा येथील दोन, जहांगीरपुरा येथील एक, बुधवार दरवाजा परिसरातील चार, देशपांडे गल्लीतील दोन, भोई गल्ली, मेनरोड व राममंदिर परिसरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, पहूर पेठ येथील संतोषीमातानगरात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यास कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

रावेरमध्ये १३ पासून जनता कर्फ्यू 
रावेर : शहर व तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना विषाणू संसर्ग लक्षात घेता नगरपालिकेच्या सदस्यांनी शहरात जनता कर्फ्यू लागू करावा अशा आशयाचे निवेदन देऊन तहसीलदारांची चर्चा केली. शहरात १३ ते १९ जुलैदरम्यान ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचे ठरविण्यात आले. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांची पालिकेच्या नगरसेवकांनी भेट घेतली. यावेळी करोनाचा संसर्ग रोखण्याबाबात चर्चा झाली. 

चाळीसगावात दोन दिवसांत ३७ रुग्ण 
चाळीसगाव : शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वीच ३७ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. आता पुन्हा शहरातील सिंधी कॉलनीतील तीन जण पाचोऱ्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. 
-------- 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona patient number crossed five thousand