कोरोनाबाधित २५ गर्भवतींवर यशस्वी उपचार 

देविदास वाणी
Wednesday, 30 September 2020

प्रसूती शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात रुग्णांना हजारो रुपयांचा खर्च येतो. परंतु डॉ. बनसोडे यांनी दर्जेदार सुविधा देऊन कोरोनाबधित महिलांच्या मनातील भीती दूर केली. त्यांना मानसिक आधार देत मोफत उपचार शासकीय यंत्रणेकडून करून दिले.

जळगाव ः येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्त्रीरोग व प्रसूती विभागात विभागप्रमुख पदावर डॉ. संजय बनसोडे गेल्या एक वर्षापासून कार्यरत आहेत. ते कोरोना काळातही रुग्णसेवा देण्यात अग्रेसर आहेत. डॉ. बनसोडे यांनी २५ कोरोनाबधित महिलांवर यशस्वीरीत्या सिझेरीयन शस्त्रक्रिया व उपचार केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उपचाराचा डॉ. बनसोडे पॅटर्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

डॉ. बनसोडे यांनी स्वतः अनेक कोरोनाबाधित महिलांची नॉर्मल प्रसूतीसुद्धा यशस्वीरीत्या केली आहे. या सर्व प्रसूत माता व बालक सुखरूप घरी गेलेले आहेत. विशेष म्हणजे या सर्व बाधित महिलांचे बाळ कोरोनामुक्त (निगेटिव्ह) आढळलेले आहेत. सीझर करण्याची कौशल्यपूर्ण पद्धत ही त्यांच्या यशाचे गमक आहे. या सर्व शस्त्रक्रिया ‘क्विक इन क्विक आउट’ पद्धतीचा वापर करून ८ ते १२ मिनिटांत पूर्ण केलेल्या आहेत. सिझेरीयनचे टाके संपूर्णपणे जिरणारे व न दिसणारे घेतल्यामुळे त्यांना काढण्याची गरज नव्हती. तत्त्वतः बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमुळे व टाके उत्तमरीत्या भरल्यामुळे रुग्ण आनंदित आहेत. 

प्रसूती शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात रुग्णांना हजारो रुपयांचा खर्च येतो. परंतु डॉ. बनसोडे यांनी दर्जेदार सुविधा देऊन कोरोनाबधित महिलांच्या मनातील भीती दूर केली. त्यांना मानसिक आधार देत मोफत उपचार शासकीय यंत्रणेकडून करून दिले. यामुळे कोरोनाबधित महिला व नातेवाईक यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागावर विश्वास वाढलेला आहे. या कामात त्यांना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. मारोती पोटे, डॉ. संदीप पटेल, डॉ. विनय पंचळवर, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. गणेश भारुळे, डॉ. बाळासाहेब सुरोसे, जयश्री जोगी, अना जोशी व विभागातील इतर डॉक्टरांचे सहकार्य लाभले. 
 

गंभीर महिलाही सुरक्षित 
या २५ सिझेरियनपैकी १० रुग्ण उच्च रक्तदाबाचे व झटके आलेले होते. दहा रुग्ण पूर्वी सिझरीयन डिलिव्हरी झालेले अतिजोखमीचे होते; तर ५ महिलांना रक्त कमी असल्याने रक्तपुरवठा करून त्यांचे सिझेरीयन करण्यात आले. दहा रुग्णांच्या बाळांचे ठोके कमी जास्त असल्याने तत्काळ सिझेरीयन करावे लागले. या सर्व गुंतागुंतीच्या अवघड शस्त्रक्रिया वेळेत व अतिशय कौशल्याने झाल्याने एकही बाळ व मातेचा मृत्यू झाला नाही. डॉ. बनसोडे यांनी घेतलेल्या दक्षतेमुळे कोरोनाविरुद्धची लढाई सर करण्यात या माता व बालकांना यश मिळाले. 
 

 संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona patient twenty-five pregnant women successful treatment