प्रवास करतांना आता ‘कोरोना’ रिपोर्ट सोबत ठेवावा लागेल 

देविदास वाणी
Wednesday, 25 November 2020

परराज्याच्या सीमेवर संलग्न असलेल्या व जळगाव हद्दीत प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर तपासणी पथकाची चोवीस तास नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव ः विमान, रेल्वे, खासगी वाहनांद्वारे तुम्ही जळगाव जिल्ह्यात येणार असाल तर तुम्हांला त्याअगोदर कोरोना चाचणी करून तिचा रिपोर्ट सोबत ठेवावा लागणार आहे. अन्यथा जिलहयात आल्याबरोबर अगोदर तुमची कोरोना चाचणी होईल, त्याचा खर्च तुमच्याकडून वसूल होणार आहे. यामुळे प्रवाशांना आता कोरोना चाचणीचा अहवाल सोबत ठेवावा लागणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत. आजपासूनच ही अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 

 

आवश्य वाचा- राज्यपालांनी खडसेंना दिल्या यशाच्या सदिच्छा 
 

देशांतर्गत विमान प्रवास करताना दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा राज्यातून जळगाव जिल्हयात येणाऱ्या कोविडची आरटी पीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत आणणे गरजेचे आहे. विमान प्राधिकरणाने प्रवाशांकडून असा अहवाल तपासून खात्री केल्यानंतर त्यांना जळगावमध्ये प्रवेश दिला जाईल. रिपोर्ट नसेल तर विमानतळावर प्रवाशांना स्व खर्चाने कोरोना चाचणी करून घ्यावी लागेल. तपासणीची व्यवस्था विमानतळावर विमान प्राधिकरण उभारली आहे. चाचणी देऊन प्रवाशांना जाऊ दिले जाईल. मात्र चाचणी पॉझिटिव्ह आल्यास प्रोटोकॉलनूसार संबंधितांवर कारवाई होणार आहे. महापालिकेच्या आयुक्तांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. 

रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांनाही हेच नियम लागू राहतील. रेल्वे स्थानकावर उतरल्याबरोबर अहवालाची तपासणी होईल. प्रवाशांचे तापमान, ऑक्सिजन तपासण्यात येईल. स्क्रीनिंग केले जाईल. उपविभागीय अधिकाऱ्यांना यावर नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांची नियुक्तीचे अधिकार देण्यात आले आहेत. 

वाचा- जळगावच्या श्रीराम रथोत्सवाला कोरोनाची ‘मोगरी’

सीमेवर २४ तास पथके 
परराज्याच्या सीमेवर संलग्न असलेल्या व जळगाव हद्दीत प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर तपासणी पथकाची चोवीस तास नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके जिल्ह्यात येणाऱ्यांकडून कोरोना निगेटिव्ह असल्याची खात्री करतील. नसेल तर त्यांची चाचणी करून खर्च त्यांच्याकडून वसूल करतील. जे तपासणी करणार नाही त्यांना जवळच्या कोविड केअर सेंटरला भरती केले जाईल. तो खर्च त्यांच्याकडून वसूल केला जाईल. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona report will now have to be kept with you while traveling