साहेब... आमचा तर फुटबॉल झाला होता ! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांची कोविड रुग्णालयात प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कोरोनाचा प्रसार रोखण्याबाबत तसेच महाविद्यालयातील कार्य प्रणाली कशी सुरळीत होईल याबाबत नियोजन करण्याचे आदेश टोपे यांनी दिले. 

जळगाव  : जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा नऊशेकडे चालला आहे. यावर आरोग्य मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला असता, जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही कोरोना टेस्ट करण्यासाठी पुणे, धुळे याठिकाणी पाठवीत होतो. परंतु त्यांच्याकडून आमच्याकडे नको अकोला, औरंगाबाद पाठवा अशी टोलवाटोलवी केली जायची त्यामुळे सुरवातीच्या काळात आमचा फुटबॉल झाला, आणि त्याचमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झाल्याची खंत जिल्हाधिकारी यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासमोर व्यक्त केली. 

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जिल्हा आढावा बैठक झाल्यानंतर कोविड रुग्णालयाची पाहणी करून त्या ठिकाणचा आढावा घेतला. यावेळी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शक्‍य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी किरण पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी रुग्णालयातील संपूर्ण सद्यःस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयात अगोदरच वैद्यकीय यंत्रणा तोकडी आहे, अशाच वैद्यकीय यंत्रणेच्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा देवून जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्याबाबत आरोग्य मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 

समन्वयाने काम करा 
जिल्हा शल्यचिकित्सक व महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या समन्वय नसल्याची तक्रार लोकप्रतिनिधींकडून आरोग्य मंत्र्यांकडे करण्यात आली होती. या आढावा बैठकीत मंत्र्यांनी सर्वांनी समन्वयाने काम करून ज्या उणिवा राहिल्या आहेत त्या भरून काढत सर्वांनी कटाक्षाने काम करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. 
जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांची कोविड रुग्णालयात प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कोरोनाचा प्रसार रोखण्याबाबत तसेच महाविद्यालयातील कार्य प्रणाली कशी सुरळीत होईल याबाबत नियोजन करण्याचे आदेश टोपे यांनी दिले. 

रुग्णांनी साधला संवाद 
आरोग्य मंत्र्यांनी अधिकाऱ्यांचा आढावा घेतल्यानंतर फोनद्वारे कोरोनाबाधित रुग्णांसोबत संवाद साधला. यावेळी या ठिकाणी जेवणासह इतर सोयी सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीने व उपचार देखील चांगले मिळत असल्याचे रुग्णांनी आरोग्य मंत्र्यांना सांगितले. 

गैरहजर डॉक्‍टरांना बडतर्फ करा 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 130 वैद्यकीय अधिकारी आहेत. परंतु अनेक डॉक्‍टर कोरोनाच्या संकटकाळात काही वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे सेवा देत नसल्याचे समोर आले आहे. अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करण्याच्या सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रशासक डॉ. बी. एन. पाटील यांना दिल्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona suspected patients samples testing eshu and problem