"कोरोना' तपासणीसाठी खासगी "लॅब'चे साहाय्य

राजेश सोनवणे
Saturday, 30 May 2020

जळगावच्या शासकीय महाविद्यालयात राज्य शासनाच्या अख्यातरीतील लॅब कार्यान्वित झाल्याने अहवाल लवकर येण्यास मदत झाली. तरी देखील कोरोनाबाधितांचा आकडा रोज वाढत असल्याने संशयितांचे स्वॅब घेण्याची संख्या देखील त्या पटीने वाढली. यामुळे लॅबवरील ताण वाढला असून, अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. 

जळगाव : "कोरोना' व्हायरसची लागण झालेल्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत संशयितांचे घेण्यात आलेले "स्वॅब' तपासणीचे अहवाल आठ- दहा दिवस प्रलंबित राहात असल्याने निदान लवकर होत नाही. यामुळे "कोरोना' बाधितांवर लवकर निदान होण्याच्या दृष्टीने अहवाल लवकर मिळण्यासाठी खासगी "लॅब'चे साहाय्य घेण्यासाठी जिल्ह्यासाठी एका लॅबशी करार करण्यात आला आहे. 

"कोरोना'चा व्हायरसचा प्रसार होत असताना सुरवातीला जळगाव जिल्ह्यातील संशयितांचे स्वॅब पुणे, औरंगाबाद येथे पाठविण्यात येत होते. येथील भार अधिक वाढल्याने धुळे येथे नवीन लॅब सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील नमुने तपासणी धुळे येथे सुरू झाली. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी जळगावच्या शासकीय महाविद्यालयात राज्य शासनाच्या अख्यातरीतील लॅब कार्यान्वित झाल्याने अहवाल लवकर येण्यास मदत झाली. तरी देखील कोरोनाबाधितांचा आकडा रोज वाढत असल्याने संशयितांचे स्वॅब घेण्याची संख्या देखील त्या पटीने वाढली. यामुळे लॅबवरील ताण वाढला असून, अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. 

"लॅब'शी करार 
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या लॅबवरील भार कमी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्‍त यांच्यावतीने जिल्ह्यासाठी एका खासगी लॅबशी करार करण्यात आला आहे. या लॅबमध्ये नमुन्यांची चाचणी होऊन बाधितांचा अहवाल कोविड रुग्णालयाकडे चोवीस तासांत देणे बंधनकारक राहणार आहे. 

कोविड सेंटरमध्ये जाणार स्वॅब घेण्यास 
कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी तालुकास्तरावर कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या सेंटरमध्ये दिवसभरात घेण्यात आलेल्या स्वॅबचे नमुने आणण्यासाठी करार करण्यात आलेल्या लॅबमधील कर्मचारी स्वतः जातील. नमुन्यांची लॅबमध्ये चाचणी घेण्यात आल्यानंतर त्याचे अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्याचे निश्‍चित झाले आहे. 
 
"त्या' लॅबमधूनही मोफत तपासणी 
"कोरोना'ची तपासणी करण्यासाठी खासगी लॅबशी करार झाला असला तरी या लॅबमधून तपासणीसाठी रुग्णाला पैसे लागणार नाहीत. कारण रुग्णांचे स्वॅबचे नमुने हे कोविड सेंटरमार्फत लॅबमध्ये येणार आहेत. मात्र, या खासगी लॅबमध्ये व्यक्तिश: जाऊन स्वतः तपासणी करणाऱ्या रुग्णांना तपासणी शुल्क लॅबकडून आकारले जाईल. याचा कराराशी काही संबंध राहणार नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona swab testing private lab contract