
संपर्कातील ‘हाय रिस्क’ व्यक्तींचा ४८ तासाच्या आत शोध घ्या!
जळगाव ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क व्यक्तींचा ४८ तासाच्या आत शोध घेतला पाहिजे. प्रतिबंधात्मक क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मायक्रो झोन तयार केले पाहिजे. जेणेकरुन त्या भागाचे सर्वेक्षण व्यवस्थित होऊन संशयित रुग्ण शोधण्यास मदत होते. प्रतिबंधात्मक क्षेत्रात सर्वेक्षण करतांना सारी व सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण सापडले पाहिजेत. कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी देण्यात येणारे थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर योग्य पध्दतीने काम करीत आहेत का ? याचीही तपासणी करावी. अशा सूचनाआरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनी आज दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. पाटील यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक यांचेशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला, यावेळी डॉ. पाटील बोलत होत्या. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) सतीश दिघे आदी उपस्थित होते.
कोविड हेल्थ सेंटरला भेटी द्या
त्या म्हणाल्या, की जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नियमितपणे प्रतिबंधात्मक क्षेत्र, कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला भेटी द्याव्यात. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये जम्बो सिलेंडरची तरतुद करावी.
ऑक्सिजन मॅनेजमेंट सिस्टिम लागू करा
सध्या राज्यात ऑक्सिजनचा साठा कमी असल्याने उपलब्ध ऑक्सिजनचा वापर योग्य पध्दतीने होण्यासाठी ऑक्सिजन मॅनेजमेंट सिस्टिम लागू करा. याकरीता प्रत्येक ठिकाणी दोन स्वतंत्र नर्सची नियुक्ती करावी. रुग्णाच्या आवश्यतेनुसारच त्याला ऑक्सिजन दिला गेला पाहिजे. दर चार तासांनी प्रत्येक रुगणांची ऑक्सिजन पातळी तपासावी. उपलब्ध ऑक्सिजन वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी,अशा सूचना डॉ.पाटील यांनी केल्या.
Web Title: Marathi News Jalgaon Corona Victims High Risk Search Individuals Forty Hight
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..