जळगावचा धोका वाढतोय : बाधितांचा आकडा सातशे पार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

जिल्ह्यात आज कोरोनाचे 37 नवे रुग्ण आढळून आले, तर 8 जणांचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज 738 वर पोहचला आहे. 

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे. दररोज नवनवीन भागात रुग्ण आढळून येत असून, ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. जिल्ह्यात आज कोरोनाचे 37 नवे रुग्ण आढळून आले, तर 8 जणांचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज 738 वर पोहचला आहे. 

नक्‍की पहा - कोरोना पॉझिटिव्ह...त्यात चालता येईना तरी कोविड सेंटरच्या गेटवर ती आली कशी
 

आज वाढलेले पॉझिटिव्ह रुग्ण 
जिल्ह्यात आज 37 नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये जळगाव शहरात 12, जळगाव ग्रामीण 2, भुसावळ 7, यावल 3, रावेर 1, धरणगाव 3, अमळनेर 1, पाचोरा 1, चोपडा 1, जामनेर 2 या प्रमाणे रुग्णांची संख्या वाढलेली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये जिल्ह्यातील 8 रुग्णांचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने त्यांना पुन्हा आयसोलेशन वॉर्डात उपचार केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

एकाच कुटुंबातील 12 पॉझिटिव्ह 
शहरातील एमआयडीसी परिसरातील 3, गेंदालाल मिल, शिवाजीनगर, शाहूनगर, पोलिस लाइन या ठिकाणांवरील प्रत्येकी एक असे सात जणांचे अहवाल शहरात पॉझिटिव्ह आले. यामध्ये मनपाचा सफाई कर्मचारी असलेल्या कर्मचाऱ्याचा आईचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, त्या सफाई कर्मचाऱ्यासह त्या कुटुंबातील 12 जणांचे अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाली असून, सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. 

जेवण वाटप करताना लागण 
शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आव्हाणे गावात देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या गावातील 32 वर्षीय तरुण एका खासगी इन्शुरन्स कंपनीत नोकरीला आहे. या कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी परप्रांतीय मजूर आपल्या गावी जात असल्याने त्यांना काही दिवस हायवेवर जेवणाचे वाटप केले होते. याच ठिकाणी या तरुणाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus sevan hundred cross