esakal | कोरोनायोद्ध्यांनी सामाजिक दातृत्वाचे दर्शन घडविले- मंत्री पाटील   
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनायोद्ध्यांनी सामाजिक दातृत्वाचे दर्शन घडविले- मंत्री पाटील   

 

आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, आरोग्यसेविका, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

कोरोनायोद्ध्यांनी सामाजिक दातृत्वाचे दर्शन घडविले- मंत्री पाटील   

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूपासून नागरिकांना दूर ठेवणे, दुर्दैवाने कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची सेवा करून त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी कोरोनायोद्ध्यांनी अहोरात्र झटून आपल्या सामाजिक दातृत्वाच्या भावनेचे दर्शन घडविले आहे, असे गौरोद्‍गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले. 

आवश्य वाचा- सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम; त्यांना ठाण्याला दाखवा : गुलाबराव पाटील यांचा पलटवार
 

येथील कांताई सभागृहात जिल्हा रुग्णालयातर्फे तयार करण्यात आलेल्या शाॅर्ट फिल्मचे प्रसारण व कोरोनायोद्ध्यांच्या सत्काराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

 
जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. जमादार, डॉ. समाधान वाघ, माजी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद, महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, तसेच कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, की कोरोना आजार तसा संपूर्ण जगासाठी नवीनच असल्याने सुरवातीला त्याच्यावर ठोस उपाय नव्हता. नवनवीन अनुभवातून औषधोपचार करून कोरोनाला आटोक्यात आणणे, हे आरोग्य विभागासाठी माठे दिव्य होते. अशाही परिस्थितीत या विभागाने हार न मानता रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना खचू न देण्याचे मोठे काम केले आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांची कामगिरी देवदुतापेक्षा नक्कीच कमी नाही. 

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की आज धनत्रयोदशी म्हणजे आयुर्वेदातील भगवान धन्वंतरी यांचा दिवस आणि या दिवशी आरोग्यदूत म्हणून काम करणाऱ्या कोरोनायोद्ध्यांचा सन्मान म्हणजे एक दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आता अधिक सक्षमपणे सज्ज असल्याने जिल्हावाशीयांनी कोरोनाच्या लाटेला घाबरून जाऊ नये. प्रत्येक नागरिकाने खबरदारी कटाक्षाने पाळलीच पाहिजे. 


आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, आरोग्यसेविका, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. सिव्हिलचे पंढरीनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रोटरीचे गनी मेमन यांनी आभार मानले. 


‘ससून’ रुग्णालयापेक्षा अद्ययावत यंत्रणा 
पालकमंत्री पाटील म्हणाले, की जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात अत्याधुनिक प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली. ही यंत्रणा उभी करण्यात जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य यंत्रणेचे यश आहे. आम्ही लोकप्रतिनिधी पाच वर्ष राहतो. मात्र अधिकारी आयुष्यभर सेवेत असतात. त्यांनी केलेल्या कामाचे चिज होऊन जिल्हा रुग्णालयात ‘ससून’ रुग्णालयापेक्षा अत्याधुनिक सुविधा सुरू झाल्या आहेत.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top