ॲन्टिजेनपेक्षा आरटीपीसीआर टेस्ट विश्‍वासार्ह 

सचिन जोशी
Thursday, 19 November 2020

जिल्ह्यात जून ते ऑगस्टदरम्यान कोरोना संसर्गाची तीव्रता कमालीची वाढली. तीन महिन्यांतच जिल्ह्यात ४० हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. मात्र, या काळात आरटीपीसीआर व ॲन्टिजेन अशा दोन्ही प्रकारच्या चाचण्याही वाढविण्यात आल्या होत्या.

जळगाव : सप्टेंबरपासून जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, यादरम्यान यंत्रणेकडून आरटीपीसीआर टेस्टच्या तुलनेने कमी विश्‍वासार्ह असलेल्या ॲन्टिजेन चाचण्यांवर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांचे सेन्सिटिव्हिटी २०-२५ टक्क्यांनी अधिक आहे. 
जळगाव जिल्ह्यात जून ते ऑगस्टदरम्यान कोरोना संसर्गाची तीव्रता कमालीची वाढली. तीन महिन्यांतच जिल्ह्यात ४० हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. मात्र, या काळात आरटीपीसीआर व ॲन्टिजेन अशा दोन्ही प्रकारच्या चाचण्याही वाढविण्यात आल्या होत्या. हे दोन्ही प्रकार मिळून या तीन महिन्यांत रोज अडीच-तीन हजार चाचण्या केल्या जात होत्या. आता १७ सप्टेंबरपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून, नोव्हेंबरमध्ये तर संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. मात्र, सोबतच चाचण्याही कमी होत आहेत. 

चाचण्यांची विश्‍वासार्हता 
सुरवातीच्या टप्प्यात केवळ आरटीपीसीआरद्वारे चाचणी केली जात होती. त्याचा अहवाल यायला दोन दिवसांपेक्षा अधिक काळ लागायचा. त्यामुळे ॲन्टिजेन किटद्वारे रॅपिड चाचण्यांची सुविधा उपलब्ध झाली. चाचणी केल्यानंतर दहा मिनिटांत अहवाल येत असल्याने ॲन्टिजेन चाचण्यांवरच भर देण्यात आला. मात्र, दोन्ही चाचण्यांच्या तुलनेत आरटीपीसीआर टेस्ट अधिक विश्‍वासार्ह मानली जात आहे. 

सेन्सिटिव्हिटीवरून निष्कर्ष 
तज्ज्ञांकडून प्राप्त माहितीनुसार या चाचण्यांच्या सेन्सिटिव्हिटीवरून त्यांची विश्‍वासार्हता निश्‍चित केली जाते. आरटीपीसीआरची सेन्सिटिव्हिटी ६७ टक्के, तर ॲन्टिजेनची केवळ ५० टक्क्यांपर्यंत आहे. अर्थात, त्यामुळे चाचण्यांचे अहवाल चुकीचे येतात, असेही नाही. मात्र, अचूक व योग्य निदानासाठी ॲन्टिजेनपेक्षाही आरटीपीसीआर टेस्ट अधिक विश्‍वासार्ह मानली जाते. म्हणूनच काही वेळा ॲन्टिजेन टेस्टमध्ये कोरोना निगेटिव्ह आलेले रुग्ण आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह आल्याची अनेक उदाहरणे आहेत. 

ॲन्टिजेनचे प्रमाण अधिक 
आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल उशिराने प्राप्त होत असल्याने ॲन्टिजेन चाचण्यांवर भर देणे स्वाभाविक आहे. मात्र, त्यामुळे अहवालांच्या परिणामांबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. सध्या दोन महिन्यांपासून बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. नव्याने आढळून येणारे अत्यल्प रुग्ण आहेत. मात्र, या काळात ॲन्टिजेन टेस्ट अधिक व आरटीपीसीआर चाचण्या कमी झाल्याचे दिसते. त्यामुळेही रुग्णसंख्या कमी आढळून येत असल्याचे बोलले जात आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus antigen test not confidance