खबरदार...विना मास्‍क फिरताय अन्‌ थुंकताय; मग अगोदर हे वाचा दंड व गुन्हा

देविदास वाणी
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

प्रशासनाने नागरीकांसाठी आता काही निर्बंध लावले असून, त्‍यानुसार कोणी आढळून न आल्‍यास दंड आणि थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

जळगाव: जिल्‍ह्‍यात कोरोनाचा फैलाव थांबण्याचे नाव घेत नाही. शिवाय आता अनलॉकच्या प्रक्रियेत मार्केट, दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आल्‍याने रस्‍त्‍यावर तसेच दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे प्रशासनाने नागरीकांसाठी आता काही निर्बंध लावले असून, त्‍यानुसार कोणी आढळून न आल्‍यास दंड आणि थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, अनेकजण विना मास्‍क फिरत असतात; तसेच रस्‍त्‍यावर थुंकत असतात. अशांसाठी काही निकष लावत आदेश काढण्यात आले आहेत. यात विना मास्क फिरणारे, गर्दी करणारे, सोशल डिस्टन्स पालन न करणारे यांना पाचशे रुपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहे. त्यासाठी महापालिका, पालिका, जिल्हा परिषद गटात पथके नेमण्याचे आदेश ही काढले आहे. 

पथकांची नियुक्‍ती
जळगाव महापालिका आयुक्‍तांनी महापालिका कार्यक्षेत्रात वार्ड विभागनिहाय एक अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेल्या स्वतंत्र पथकाची नेमणूक करावी. याबाबतच्या नियंत्रण व परिक्षण करणे कामी एक नोडल अधिकारी यांची नेमणूक करावी. पथकास दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकारी प्रदान करण्यात यावे. तर उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडेंट कंपनी कमांडर यांनी ग्रामीण भागात जिल्हा परिषद गटनिहाय, नगरपालिका क्षेत्रात वाढ प्रभागनिहाय एक अधिकारी व दोन कर्मचारी यांचा समावेश असलेला स्वतंत्र पथकाची स्थापना करावी. त्यांच्या दंड करण्याची कारवाई करण्याचा अधिकार प्रदान करावे. पथकाने त्यांच्या कार्यक्षेत्रात जे नागरिक सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी व वाहतूक प्रवास करताना मास्कचा वापर न करताना आढळून आल्‍यास पाचशे रुपये दंडाची आकारणी करावी.

वाहनांसाठी असे आहेत निकष
रस्‍त्‍यावर वाहन काढणाऱ्यांसाठी देखील काही निषक लावण्यात आले आहेत. यात दुचाकी वाहनावर दोन जणांनाच परवानगी आहे. तर तीन चाकी वाहनात तीन आणि चार चाकीत वाहनात चारच जणांना बसून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निकषानुसार वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास पाचशे रुपये दंड घेतला जाईल.

तर प्रतिमाणसी होणार दंड व गुन्हा
कोणत्याही दुकानात एका वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक असणार नाही, दुकानात येणाऱ्या कोणत्याही ग्राहकाने मास्क न लावल्यास 
माल पुरवठा करू नये. एका ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पालन न करता, अनावश्यकरित्‍या पाच पेक्षा जास्त गर्दी करून जमा झालेल्या नागरिक आढळून आल्यास प्रतिव्यक्ती रुपये दोनशे दंडाची आकारणी असेल. त्‍याचप्रमाणे संबंधितावर नमूद कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही होईल.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus new rules collector abhijit raut people no mask