जिल्‍ह्‍यात याठिकाणी खासगी तत्वावर कोविड रुग्णालय... बेड बेसीसवर उपचार 

देविदास वाणी
Saturday, 25 July 2020

अनेक कोविड रुग्णांना खासगी डॉक्टरांच्या पध्दतीने सेवा हवी असते. रुम वेगळी, डॉक्टर स्वतंत्र हवा असतो. अशा रुग्णांसाठी खासगी कोविड रुग्णालयांना परवानगी दिली आहे. ज्या रुग्णांना जिल्हा कोविड रुग्णालयातील सेवा घ्यायची ते तेथे घेऊ शकतात. खासगी रुग्णालयातील सेवा पेड बेसीसवर आहे. 

- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी  

जळगाव : शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे वाढणारे रुग्ण लक्षात घेता आरोग्य प्रशासनाने जळगाव शहरात सहा तर अमळनेरला तीन ठिकाणी खासगी तत्वावर कोविड रुग्णालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील अधिक पॉझिटिव्ह रुग्णांवर लवकरात लवकर उपचार करता येणे शक्य होणार आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली. 

जळगाव शहरात पूर्वीपासून गोल्ड सिटी हे एकमेव खाजगी रुग्णालयात कोविडचे रुग्ण भरती करून उपचार करीत होते. २१ जुलैच्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्यात जळगावमधील डॉ. राहुल महाजन (चिन्मय हॉस्पिटल), डॉ. रवींद्र पाटील (द्वारका हॉस्पिटल), डॉ. पल्लवी केतन राणे (रुबी हॉस्पिटल), डॉ. परीक्षित बाविस्कर (अनुश्री हॉस्पिटल), डॉ. धनराज चौधरी (लोकसेवा हॉस्पिटल), डॉ. पंकज राणे (ओम क्रिटिकल अँड ट्रॉमा सेंटर) यांना शहरात परवानगी दिली आहे. अमळनेरमधील डॉ. निखिल बहुगणे (बहुगुणे हॉस्पीटल), डॉ. किरण बडगुजर (श्रीदत्त हॉस्पिटल, नर्मदा मेडिकल फाउंडेशन अशा एकूण ९ दवाखान्यांना कोविड पेशंट उपचार करण्याची परवानगी दिलेली आहे. 

अन्य जिल्ह्यातील रूग्‍णांनाही घेता येतील उपचार‍
जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर बऱ्हाणपूर, खंडवा, धुळे व बुलढाणा येथील कोविड रुग्णांना या रग्णालयात उपचार घेता येतील. शहर हॉटस्पॉट होत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. उल्हास पाटील कॉलेज येथील बेड संख्येच्या जास्त रुग्ण मिळून येत असल्याने प्रशासनासमोर जटील प्रश्न उभा होता. या खासगी रुग्णालयात आता पॉझिटिव्ह पेशंट उपचार करण्यासाठी परवानगी मिळाल्याने अधिक संख्येने रूग्ण दाखल करून बरे होतील. 

नियमानुसारच फि
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने २१ मे २०२० रोजी आदेश क्रमांक कोरोना- २०२०/ सी आर ९७/ एआरओ-५ मधील परिशिष्ट सी प्रमाणे फी आकारणीचा मसुदा दिला आहे. त्या व्यतिरिक्त अथवा जास्त फी आकारू नये; अशी रास्त मागणी जळगाव कोविड केअर युनिटने जिल्हाधिकारी जळगाव यांच्या माध्यमाने या सर्व व खासगी हॉस्पिटलला २३ जुलै रोजी ई-मेल द्वारे केलेली आहे. 
 

जिल्ह्यात ९ खासगी कोविड रुग्णालये बेड बेसीसवर चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. रुग्णामधील लक्षण पाहून येथे उपचाराची पध्दती अवलंबिली जाईल. ४५०० ते ९५०० हा एका बेडचा दर रुग्णांच्या प्रकृतीची स्थिती पाहून ठरविला जाईल. रुग्णाला असलेली लक्षणे व त्याला कोणती आरोग्य सुविधा दिली. यावर हा दर अवलंबून राहील. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक. 
 

संपादन : राजेश सोनवणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus nine private hospital in covid treatment