ॲक्टिव्ह रुग्ण नऊ हजारांनी घटले 

सचिन जोशी
Tuesday, 3 November 2020

दोनच महिन्यांत जिल्ह्यात २० हजारांहून अधिक रुग्ण वाढले. सप्टेंबरच्या १७ तारखेपर्यंत नव्या रुग्णवाढीचा आलेख वाढता होता. दररोज आठशे-हजार, अकराशे रुग्ण आढळून येत होते. ती संख्या सातत्याने कमी होऊ लागली. 

जळगाव : सप्टेंबरच्या १७ तारखेपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत आहे. दररोजचे रुग्ण कमी होत असल्याने गेल्या ऑक्टोबर महिन्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तब्बल नऊ हजारांनी घटली परिणामी, ऑक्सिजन व आयसीयू बेडवरील रुग्णसंख्याही कमी होऊन आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. 
जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या बाबतीत जुलै व ऑगस्ट हे दोन महिने अत्यंत तीव्र स्वरूपाचे गेले. या दोनच महिन्यांत जिल्ह्यात २० हजारांहून अधिक रुग्ण वाढले. सप्टेंबरच्या १७ तारखेपर्यंत नव्या रुग्णवाढीचा आलेख वाढता होता. दररोज आठशे-हजार, अकराशे रुग्ण आढळून येत होते. ती संख्या सातत्याने कमी होऊ लागली. 

महिनाभरात पाच हजार रुग्ण 
ऑक्टोबरचा संपूर्ण महिना संपूर्ण यंत्रणेसाठी मोठा दिलासादायक ठरला. १ ऑक्टोबरपासूनच रुग्णसंख्येचा आलेख घसरत गेला. १ ऑक्टोबरला प्राप्त अहवालात नवे ३०४ रुग्ण आढळल्यानंतर एकूण रुग्णसंख्या ४८ हजार १८० वर पोचली होती. या महिन्याच्या शेवटी ३१ ऑक्टोबरला अवघे ४४ नवे रुग्ण वाढून एकूण रुग्णसंख्या ५३ हजार १९३ झाली. म्हणजे महिनाभरात जिल्ह्यातील एकूण रुग्णांत नव्या पाच हजार १३ रुग्णांची भर पडली. 

ॲक्टिव्ह रुग्ण झाले कमी 
याच ऑक्टोबर महिन्यात ॲक्टिव्ह रुग्णांबाबत मोठा दिलासा मिळाला. १ ऑक्टोबरला पाच हजार ८४० ॲक्टिव्ह रुग्ण होते. महिन्याच्या शेवटी ३१ तारखेला ही संख्या ८४० पर्यंत खाली आली. म्हणजे या ३० दिवसांत तब्बल नऊ हजार २७६ ॲक्टिव्ह रुग्ण कमी झाले. शिवाय, ऑक्सिजन व आयसीयू बेडवरील रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली. १ ऑक्टोबरला ऑक्सिजनवरील रुग्ण ७०९, तर आयसीयू बेडवरील रुग्ण २७० होते. तीच संख्या ३१ ऑक्टोबरला घटून ऑक्सिजन बेडवरील रुग्ण १३३ व आयसीयूतील रुग्ण अवघे ४३ राहिले. 
 
अशी आहे आकडेवारी 
तारीख------एकूण रुग्ण-----ॲक्टिव्ह रुग्ण 
१ ऑक्टो----४८,४८४-------५,८४० 
१० ऑक्टो---५०,९२६-------२,९९० 
२० ऑक्टो---५२,१७१-------१,७७५ 
३१ ऑक्टो---५३,१९३-------८४० 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus nine thousand active patients down last month