दिलासादायक..रूग्‍णालयात दाखल रूग्‍णांची संख्या पाच हजाराखाली!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

जिल्‍ह्‍यातील कोरोना व्हायरसचे वाढते प्रमाण चिंता वाढविणारे होते. गेल्‍या महिन्यात तर अगदी भितीदायक चित्र निर्माण झाले होते. बाधितांची रोजची संख्या ही हजाराच्यावर येत होती. तुलनेत बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या तिनशे- चारशेच्या घरात होती.

जळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधितांची संख्या वाढण्याचे प्रमाण काही प्रमाणात मंदावले आहे. असेच दिलासादायक चित्र आणखी काही दिवस राहिल्‍यास जिल्‍हा ग्रीन झोनमध्ये येवू शकतो. याकरीता प्रत्‍येकाने काळजी घेणे हे प्रत्‍येकासाठी फायद्याचे ठरणारे आहे. कोरोनाची लागण झाल्‍यानंतर उपचार घेणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली होती. आता मात्र ही संख्या कमी होवून पाच हजाराच्या खाली आहे. 
जिल्‍ह्‍यातील कोरोना व्हायरसचे वाढते प्रमाण चिंता वाढविणारे होते. गेल्‍या महिन्यात तर अगदी भितीदायक चित्र निर्माण झाले होते. बाधितांची रोजची संख्या ही हजाराच्यावर येत होती. तुलनेत बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या तिनशे- चारशेच्या घरात होती. परंतु आता चित्र बदलले असून, बरे होणारे अधिक आणि बाधितांची संख्या कमी येत आहे. यामुळे जिल्‍ह्‍यात सध्यातरी दिलासादायक चित्र आहे. बाधितांची संख्या वाढल्‍याने जिल्‍ह्‍याचा रिकव्हरी रेट ८७.८७ टक्‍क्‍यांवर आला आहे.

बाधित पन्नास हजाराच्या उंबरठ्यावर
जिल्‍ह्‍यात आज आलेल्‍या अहवालानुसार २९८ नवे कोरोना बाधित झाले आहेत. तर ८०५ रूग्‍ण हे बरे होवून घरी परतले आहेत. परंतु, जिल्‍ह्‍यात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्‍यांचा आकडा हा ४९ हजार १०४ वर पोहचला आहे. तर बरे होणाऱ्यांचा आकडा ४३ हजार १४८ वर पोहचला आहे. तर सध्या स्‍थितीला ४ हजार ७५८ रूग्‍ण असून ते उपचार घेत आहेत.

पुन्हा सात जणांचा मृत्‍यू
कोरोनाची लागण झाल्‍यानंतर उपचारादरम्‍यान मृतांची संख्या देखील वाढतच आहे. आज देखील जिल्‍ह्‍यात एकूण सात जणांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला असून सर्व मृत झालेले हे ६० वर्षावरील होते. जिल्‍ह्‍यात आतापर्यंत १ हजार १९८ जणांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला असून, मृत्‍यू दर २.४६ टक्‍के आहे.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर ७६, जळगाव ग्रामीण ११, भुसावळ २२, अमळनेर ६, चोपडा २५, पाचोरा ७, भडगाव २, धरणगाव ७, यावल ८, एरंडोल १, जामनेर ४, रावेर ७, पारोळा ३, चाळीसगाव ७, मुक्‍ताईनगर १०४, बोदवड ५, इतर जिल्‍ह्‍यातील ३ रूग्‍णांचा समावेश आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus positive patient figer low