
जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर पाठोपाठ नोव्हेंबरमध्येही कोरोना संसर्गाचा आलेख उतरता आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या अद्यापही दोनअंकी व गेल्या काही दिवसांपासून अगदी ५०च्या आतली आहे.
जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात येत आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालात जिल्ह्यातील तब्बल ९ तालुक्यांत एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. तर जळगाव शहरतील १९ रुग्णांसह ३३ नवे बाधित आढळून आले. त्यापेक्षा अधिक म्हणजे ५२ रुग्ण दिवसभरात बरेही झाले.
जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर पाठोपाठ नोव्हेंबरमध्येही कोरोना संसर्गाचा आलेख उतरता आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या अद्यापही दोनअंकी व गेल्या काही दिवसांपासून अगदी ५०च्या आतली आहे. शुक्रवारी आढळून आलेल्या ३३ रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ७३०वर पोचली असून बरे झालेल्यांच्या आकड्याने ५२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत एका रुग्णाच्या मृत्यूमुळे बळींची संख्या १२७५ झाली आहे. शुक्रवारी अडीच हजार अहवाल प्राप्त झाले. जिल्ह्यातील जळगाव ग्रामीणसह अमळनेर, पाचोरा, धरणगाव, भडगाव, यावल, एरंडोल, पारोळा, बोदवड या ९ तालुक्यांमध्ये शुक्रवारी एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही.
जळगावात संसर्ग
जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक चित्र असले तरी जळगाव शहरात मात्र चिंता कायम आहे. दोन रुग्ण आढळल्याने कालचा दिवस दिलासादायक गेल्यानंतर शुक्रवारी पुन्हा जळगाव शहरात तब्बल १९ रुग्ण आढळून आले. भुसावळला २, चोपड्याला ३, जामनेरला ३, रावेर २, चाळीसगाव ३, मुक्ताईनगर १ असे रुग्ण सापडले.