कोरोना बाधितांचा चार महिन्यांतील निचांक; दिवसभरात केवळ ६० रूग्‍ण 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत कोरोना संसर्गाने कहर केला होता. १७ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख खाली येत असून आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत आहे.

जळगाव : नव्या कोरोना बाधितांच्या दररोजच्या आकड्यांमध्ये गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक दिलासादायक दिवस म्हणून रविवारची नोंद झाली. चार महिन्यांतील निचांकी आकडा नोंदला गेला. रविवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात अवघ्या ६० रुग्णांची नोंद झाली, तर १९३ रुग्ण बरे झाले. 
जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत कोरोना संसर्गाने कहर केला होता. १७ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख खाली येत असून आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत आहे. सप्टेंबरपर्यंत दररोज आठशे- हजारावर रुग्ण आढळून येत असताना महिनाभरापासून त्यात मोठी घट होत आहे. आज गेल्या चार महिन्यातील सर्वांत कमी म्हणजे अवघ्या ६० रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या ५१ हजार ८८९ झाली असून १९३ बरे झालेल्या रुग्णांसह एकूण बरे झालेल्यांचा आकडा ४८ हजार ७६६वर पोचला आहे. बरे झालेल्यांचे प्रमाण तब्बल ९४ टक्के झाले आहे. ॲक्टिव रुग्णांची संख्या प्रथमच दोन हजारांच्या आत आली असून सध्या केवळ १८८२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी १३६६ रुग्ण लक्षणे नसलेले, ५१६ रुग्णच लक्षणे असलेले आहेत. 

मृत्यूदर कायम 
एकीकडे नव्याने रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत असताना, रिकव्हरी रेट ९४ टक्के झालेले असताना जिल्ह्यातील मृत्यूदर अद्याप दोन टक्क्यांच्या आत आलेला नाही. आजच्या तीन जणांच्या मृत्यूसह एकूण बळी १२४१ झाले असून मृत्यूदर २.४० टक्के आहे. 

चार तालुक्यात नवे रुग्ण नाही 
रविवारी जळगाव ग्रामीणसह पाचोरा, एरंडोल या तीन तालुक्यांत एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. असे आढळले रुग्ण : जळगाव शहर ६, भुसावळ ३, अमळनेर १२, चोपडा १, भडगाव ४, धरणगाव १, यावल ३, जामनेर १२, रावेर ६, पारोळा ४, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर ३, बोदवड १. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus update lowest figure last four month