सात महिन्यातील निच्चांकी आकडा; आठ तालुक्‍यात एकही रूग्‍ण नाही

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

महिनाभरापुर्वी हजाराच्यावर निघणारे रूग्‍णांची संख्या घटली आहे. विशेष म्‍हणजे दिवाळी खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असली तरी तुलनेत बाधितांचा आकडा कमी निघत आहे.

जळगाव : जगात थैमान घालणारा कोरोनाचा जळगाव जिल्‍ह्‍यातील वाढलेला प्रादुर्भाव कमी झाला आहे. जिल्‍ह्‍यात पहिला रूग्‍ण आढळल्‍यानंतर सातत्‍याने वाढणाऱ्या रूग्‍णसंख्येनंतर साधारण सात महिन्यांनंतर सर्वात निच्चांकी बाधित रूग्‍णांची नोंद आज झाली आहे. 
कोरोनाचा संसर्ग वाढत जात जिल्ह्यातील रुग्णसंख्येने 53 हजारांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. महिनाभरापुर्वी हजाराच्यावर निघणारे रूग्‍णांची संख्या घटली आहे. विशेष म्‍हणजे दिवाळी खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असली तरी तुलनेत बाधितांचा आकडा कमी निघत आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील रुग्ण संख्येत घट होत असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. 

सर्वात मोठा दिलासा
कोरोनाचा पहिला रूग्‍ण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आढळून आला होता. यानंतर बाधित रूग्‍णांमध्ये सातत्‍याने वाढ होत राहिली. परंतु, एप्रिलनंतर म्हणजे गेल्या सात महिन्यात जिल्ह्यात सर्वात कमी रुग्णांची नोंद आज झाली. रविवारी सायंकाळी प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात दिवसभरात १८ नवीन बधितांची नोंद झाली. तर दिवसभरात ६८ रुग्ण बरे होवून घरी गेले. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५७१ वर आली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधितांची संख्या ५३ हजार ५५० इतकी झाली आहे. आतापर्यंत १ हजार २७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर ११, भुसावळ १, अमळनेर १, पाचोरा १, धरणगाव १, रावेर १, यावल १, मुक्‍ताईनगर १ तर बोदवड, चाळीसगाव, पारोळा, जामनेर, एरंडोल, भडगाव, चोपडा आणि जळगाव ग्रामीणमध्ये एक देखील रूग्‍ण आढळून आला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus update lowest positive patient last eight month