
गेल्या आठवड्यात तीन दिवस पन्नासपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली होती. मात्र, दोन दिवसांपासून नव्या बाधिताची संख्या कमी होतान दिसत आहे.
जळगाव : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या तीसच्या आत राहिली. रविवारी प्राप्त अहवालात २८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात ३३ बरे झाले. आज दुसऱ्या दिवशीही मृत्यूची नोंद झाली नाही, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.
जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या घटू लागली आहे. थंडीच्या कडाक्यासोबत रुग्ण वाढतील, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, ती सध्यातरी फोल ठरली आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस पन्नासपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली होती. मात्र, दोन दिवसांपासून नव्या बाधिताची संख्या कमी होतान दिसत आहे. शनिवारी २९ रुग्ण आढळून आल्यानंतर रविवारीही २८ नव्या बाधितांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या ५६ हजारांच्या टप्प्यात पोचली आहे. तर ३३ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार २१० झाला आहे. जिल्ह्यातील बळींची संख्या १३२९ आहे. सध्या जिल्ह्यात ४३९ ॲक्टिव रुग्ण असून त्यापैकी सुमारे तीनशेवर रुग्णांना लक्षणे नाहीत.