corona update आठवड्यानंतर पुन्हा बरे होणारे अधिक 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

जळगाव जिल्ह्यात दिवाळीपूर्वी दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या सातत्याने घटत होती. बरे होणाऱ्यांची संख्या अधिक व नवे बाधित त्यापेक्षा कमी अशी स्थिती सलग दोन महिने राहिल्यानंतर ॲक्टिव रुग्णसंख्या चारशेच्या आत आली.

जळगाव : दिवाळीनंतर दररोज आढळणारे रुग्ण अधिक व बरे होणारे कमी अशी आठवड्यापासून स्थिती असताना रविवारी मात्र पुन्हा नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या थोडी का होईना अधिक होती. रविवारी प्राप्त अहवालात नवे २३ रुग्ण आढळून आले तर ३५ जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात एकाचा मृत्यू झाला. 
जळगाव जिल्ह्यात दिवाळीपूर्वी दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या सातत्याने घटत होती. बरे होणाऱ्यांची संख्या अधिक व नवे बाधित त्यापेक्षा कमी अशी स्थिती सलग दोन महिने राहिल्यानंतर ॲक्टिव रुग्णसंख्या चारशेच्या आत आली. दिवाळीनंतर मात्र पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली. गेल्या आठवडाभरापासून नवे बाधित अधिक व बरे होणारे कमी असे आकडे समोर येत होते. 

नवे बाधित कमी 
रविवारी मात्र या मालिकेत खंड पडला. गेल्या २४ तासांत नव्या २३ रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या ५४ हजार ५२५ झाली आहे, तर ३५ जणांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५२ हजार ६७७वर पोचला आहे. रविवारी एका ८६ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यामुळे बळींची संख्या १२९७ झाली आहे. 
 
११ तालुक्यांत रुग्ण नाही 
रविवारी प्राप्त अहवालानुसार अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा, चाळीसगाव व मुक्ताईनगर या ११ तालुक्यांमध्ये एकाही रुग्णाची नोंद आढळली नाही. केवळ जळगाव शहर १४, भुसावळ ३, जळगाव ग्रामीण २, यावल व बोदवड प्रत्येकी १ असे रुग्ण आढळले. 
 
चाचण्या झाल्या कमी 
तीन दिवसांपासून जिल्ह्यातील नव्या बाधितांची संख्या नियंत्रणात असल्याचे चित्र असले तरी या तीन दिवसांत चाचण्यांची संख्याही बऱ्यापैकी कमी झाली आहे. गुरुवारी (ता.२६) सुमारे १८०० चाचण्यांच्या अहवालात ५३ रुग्ण आढळले, शुक्रवारी (ता.२७) २५०० अहवाल प्राप्त झाले, पैकी ७४ रुग्ण बाधित आढळले. शनिवारी (ता.२८) प्राप्त १४०० अहवालांपैकी ४५ रुग्ण आढळले तर रविवार केवळ ७०० अहवाल प्राप्त झाले, त्यातून २३ जण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे चाचण्या कमी होत असल्याने रुग्णसंख्याही कमी असल्याचे दिसून येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus update new patient ratio down