रुग्णसंख्या पुन्हा घटली, पण जळगाव, भुसावळची स्थिती गंभीर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

जळगाव जिल्ह्यात दिवाळीनंतर सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. दोन महिन्यांपासून बरे होणारे अधिक व नवीन रुग्ण कमी, अशी मालिका खंडीत झाली आहे.

जळगाव : बुधवारी शंभरीच्या टप्प्यातील रुग्णसंख्येने गुरुवारच्या अहवालात थोडा दिलासा मिळाला. दिवसभरात नवे ५३ रुग्ण आढळून आले. मात्र, कालच्या तुलनेने प्राप्त चाचण्यांचे अहवालही आज कमी होते. तर गेल्या २४ तासांत एक मृत्यू होऊन ३१ रुग्ण बरे झाले. 
जळगाव जिल्ह्यात दिवाळीनंतर सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. दोन महिन्यांपासून बरे होणारे अधिक व नवीन रुग्ण कमी, अशी मालिका खंडीत झाली आहे. गुरुवारी सलग सहाव्या दिवशी बरे होणारे कमी व नवे बाधित अधिक, अशी स्थिती होती. आजच्या ५३ रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या ५४ हजार ३८३ झाली आहे. तर ३१ बरे झालेल्या रुग्णांसह कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा ५२ हजार ५५६ झाला आहे. गेल्या २४ तासांत जळगाव शहरातील ५७ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा १२९२ झाला आहे. 
 
जळगाव, भुसावळची स्थिती गंभीर 
जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये तुलनेने कमी रुग्ण आढळून येत असताना जळगाव व भुसावळमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढतेय. आजच्या ५३ रुग्णांमध्ये जळगावचे १८ व भुसावळचे १५ असे ३३ रुग्ण या दोन्ही शहरांमधील आहेत. अमळनेरला २, चोपड्याला १, पाचोऱ्याला १, यावल १, रावेर १, जामनेर १, पारोळा ५, चाळीसगाव २, मुक्ताईनगर ३ असे रुग्ण आढळून आलेत. जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या ५३५वर पोचली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus update positive patient ratio low