रुग्ण घटत असताना मृत्यूदर मात्र कायम 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

जळगाव जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. १७ सप्टेंबरपासून दररोज बाधित होणाऱ्यांची संख्या कमी होऊन बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत आहे.

जळगाव : महिनाभरापासून रुग्ण घटत सातत्याने घटत असताना कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. गेल्या महिन्यात जेवढा मृत्यूदर होता, तेवढाच आजही कायम आहे. तर, दिवसभरात नव्याने १३० रुग्ण बाधित आढळले व २१५ जण बरे होऊन घरी गेले. 
जळगाव जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. १७ सप्टेंबरपासून दररोज बाधित होणाऱ्यांची संख्या कमी होऊन बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील रुग्णांमध्ये १३०ची भर पडून एकूण रुग्णसंख्या ५२ हजार १७१ झाली आहे. तर २१५ रुग्ण बरे झाल्यानंतर एकूण बरे झालेल्यांचा आकडा ४९ हजार १५० झाला आहे. दिवसभरात दोघांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या १२४६ झाली आहे. मृत्यूदर गेल्या महिन्यात जेवढा आहे, तेवढाच कायम आहे. 

चाचण्या वाढूनही रुग्ण कमी 
गेल्या महिनाभरापासून रुग्णसंख्या सातत्याने घटत असल्याने चाचण्यांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. चाचण्या कमी झाल्याने रुग्ण कमी होत असल्याचे बोलले जात होते. अर्थात, गेल्या काही दिवसांपासून चाचण्या हजार, पंधराशेपर्यंत मर्यादित झाल्या होत्या. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून चाचण्यांची संख्या वाढून अडीच, तीन हजारांवर गेली. तरीही रुग्ण दीडशेपर्यंतच आढळले. 
 
जळगाव शहराला दिलासा 
सोमवारी शहरात ५७ रुग्ण आढळून आल्यानंतर आज पुन्हा त्यातून थोडा दिलासा मिळाला. दिसवभरात शहरात २९ रुग्ण आढळून आले. शहरातील रुग्णसंख्याही घटत असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढतेय. त्यामुळे शहरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या हजारापेक्षा खाली आली आहे. सध्या शहरात केवळ ९०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
 
असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर २९, जळगाव ग्रामीण १०, भुसावळ १३, अमळनेर ४, चोपडा ४, पाचोरा १, भडगाव १, धरणगाव २, यावल ३, जामनेर ४८, रावेर ६, पारोळा १, चाळीसगाव ५, मुक्ताईनगर १, बोदवड २. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus update same condition death ratio