जळगाव कोरोना : सात तालुक्यांत नवीन एकही रुग्ण नाही 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

जळगाव जिल्ह्यात दीड महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात नियंत्रित झाला आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार नव्या बाधितांची संख्या शंभराच्या आत म्हणजे ६७ होती.

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये नवीन एकही रुग्ण आढळून आला नाही. जळगाव शहरातील ४१ नव्या रुग्णांसह दिवसभरात ६७ नवे रुग्ण बाधित आढळले. तर १५६ रुग्ण बरे झाले. दसऱ्याच्या दिवशी एकही मृत्यू नसताना सोमवारी मात्र चार जणांचा कोरोनामुळे बळी गेला. 
जळगाव जिल्ह्यात दीड महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात नियंत्रित झाला आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार नव्या बाधितांची संख्या शंभराच्या आत म्हणजे ६७ होती. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५२ हजार ८६२ झाली आहे. तर १५६ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्यांचा आकडा ५० हजार ४०८वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत ४ जणांचा बळी गेल्याने एकूण मृत्यूसंख्या १२५८ झाली असून मृत्यूदर मात्र कायम आहे. सोमवारी जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्येही नव्याने बाधित एकही रुग्ण आढळला नाही. यात जळगाव ग्रामीणसह पाचोरा, एरंडोल, धरणगाव, यावल, पारोळा, बोदवड या तालुक्यांचा समावेश आहे. 

जळगावात धोका कायम 
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संसर्ग कमी होत असताना जळगाव शहरात मात्र संसर्गाचा धोका व दररोजच्या बाधित रुग्णांची संख्या अधिकच आहे. सोमवारीही शहरात ४१ रुग्ण बाधित आढळून आले. त्यामुळे बाधितांची शहरातील एकूण संघ्या ११ हजार १४५वर पोचली आहे. सध्या शहरातील ५९९ रुग्ण ॲक्टिव आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus update sevan taluka no patient