‘खड्डेमुक्त शहराच्या प्रकाशमय शुभेच्छा’ मिळणार काय? 

सचिन जोशी
Monday, 16 November 2020

दोन-तीन दिवसांपूर्वी पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या माध्यम क्षेत्रातील आमच्या एका मित्राचा अपघात झाला. पहाटेच बाहेरगावी जाण्यासाठी निघताना आपल्या दुचाकीवर ते मुलासह बसले. ‘अमृत’च्या कामासाठी खोदून, नंतर तात्पुरती डागडुजी करूनही खड्ड्यांच्या दुनियेतील या रस्त्यावर अर्धा किलोमीटर पार केल्यानंतर त्यांचे वाहन स्लीप झाले.

‘अमृत’ची रखडलेली कामे, त्यामुळे झालेली रस्त्यांची चाळण, हाडं खिळखिळी करणारे मोठ्ठाले खड्डे... त्यावर मलमपट्टी म्हणून टाकलेल्या वेस्ट मटेरिअल, मुरमातून उठणारे धुळीचे लोट... अशा वातावरणात ऐन दिवाळीत जळगावकरांच्या नशिबी धुळवड साजरी करायची वेळ आलीय... याही स्थितीत संयमी नागरिक केवळ बोटं मोडत दिवाळी साजरी करताय.. पालिकेची धुरा सांभाळणारी मंडळी आणि त्यांच्या नेत्यांच्या शुभेच्छांचे संदेशही सोशल मीडियावरून खुला प्रवास करताना या संदेशांत ‘खड्डेमुक्त जळगावच्या प्रकाशमय शुभेच्छा’ हा संदेश दुर्दैवाने कुठेही दृष्टीस पडत नाही. 

दोन-तीन दिवसांपूर्वी पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या माध्यम क्षेत्रातील आमच्या एका मित्राचा अपघात झाला. पहाटेच बाहेरगावी जाण्यासाठी निघताना आपल्या दुचाकीवर ते मुलासह बसले. ‘अमृत’च्या कामासाठी खोदून, नंतर तात्पुरती डागडुजी करूनही खड्ड्यांच्या दुनियेतील या रस्त्यावर अर्धा किलोमीटर पार केल्यानंतर त्यांचे वाहन स्लीप झाले. अंगा-खांद्याला कुठेही जखम नाही, मात्र गुडघा फ्रॅक्चर... मित्र हॉस्पिटलमध्ये दाखल. आज- उद्यामध्ये ऑपरेशन करून पायात रॉड टाकला जाईल, असो.. 
हा किस्सा सांगायचे कारण एवढेच की, ही आहे आपल्या कथित स्वच्छ व सुंदर शहराची स्थिती. ही स्थिती आजच, अचानक ओढवली असेही नाही. नागरी सुविधांबाबत जळगावकरांच्या नशिबी नरक यातना यायला अनेक वर्षांची परंपरा आहे. अर्थात, तीन-चार वर्षांत या यातना व्यापक जनसमुदायाला अधिक असह्य, तीव्र वेदना देणाऱ्या आहेत, हाच काय तो फरक. 
मनपातील सत्ताधाऱ्यांच्या दोन्ही कार्यकाळांची तुलना होऊ शकत नाही. कारण जैन गटाने पालिकेवर १८ महिन्यांचा अपवाद वगळता जवळपास ३५ वर्षे निर्विवाद वर्चस्व गाजविले. भाजपच्या सत्ताकाळाला उणीपुरी दोन वर्षे झालीत. तरीही, या दोन वर्षांत एकूणच पालिकेची वाटचाल पाहता भाजपच्या प्रगतिपुस्तकावर ‘लाल शेरा’च मारावा लागेल. सत्तेची दोन वर्षे गेलीत.. तरीही रस्ते, स्वच्छता, पथदिव्यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांच्या पातळीवर ‘अंधार’ असेल तर सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्‍न उपस्थित करावाच लागेल. 
सध्या किमान रस्ते या रोजच्या घटकाशी संबंधित विषयाचे विश्‍लेषण करायचे झाल्यास अशा अवस्थेतील रस्ते महापालिका म्हणविणाऱ्या कोणत्या शहरात सापडतील का? हा प्रश्‍न पडावा. रस्त्यांच्या या अवस्थेमागे ‘अमृत’ची रखडलेली कामे, निधी आदी कारणे दिली जातात. प्रत्यक्षात नियोजनाचा व निधीच्या योग्य विनियोजनाचा अभाव, हेच यामागील प्रमुख कारण दिसते. 
म्हणायला भाजपची सत्ता असली तरी पालिकेचा रिमोट सत्ताधारी-विरोधकांमधील काही ‘खास’ नगरसेवकांच्या हाती आहे, हे सर्वश्रुत आहे आणि याच मंडळींना जर शहर सुधारण्याची इच्छा नसेल, तर शहराचे वाटोळे होणारच.. जळगावात नेमके तेच झालेय. त्यामुळेच शहराच्या एकूणच या अवस्थेबद्दल नेत्यांनी नगरसेवक, प्रशासनाकडून रिपोर्ट मागवून चालणार नाही.. रिझल्टस्‌ मागावे लागतील. दिवाळीचे पर्व विकासाची नवी पहाट, आरोग्य व समृद्धी घेऊ येणारे ठरावे... अशी शुभेच्छा, जर लोकप्रतिनिधी देत असतील तर या लोकप्रतिनिधींनाही ईश्‍वर ‘खड्डेमुक्त रस्ते व प्रकाशमय शहर’ या आश्‍वासनपूर्तीची सद्‌बुद्धि देवो.. हीच कामना करूया..! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation aria damage road issue