esakal | महाजनांच्या पक्षाचे सरकार, कोणतीही चौकशी लावा! 
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon corporation

आरोग्य विभागातील साहित्य खरेदीबाबत विल्सन फार्माची निविदा पात्र असताना अतुलसिंह यांची भागीदारी असलेल्या एजन्सीची निविदा मंजूर करण्यात आल्याचा आरोप महाजन यांनी ऍड. शुचिता व अतुलसिंह हाडा यांच्यावर केला होता.

महाजनांच्या पक्षाचे सरकार, कोणतीही चौकशी लावा! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पहिल्या पत्रकार परिषदेत सुनील महाजनांनी केलेल्या आरोपांबाबत मी पुरावे मागितल्यावर त्यांनी तो विषय सोडून दिला. आता दुसरा आरोपही महाजनांनी कोणतेही पुरावे सादर न करता केला आणि या आरोपांबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याचे सांगितले. महाजनांच्या पक्षाचे सरकार राज्यात आहे, त्यांनी कोणतीही चौकशी लावावी. आम्ही तयार आहोत, असे खुले आव्हान मनपा स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा यांनी दिले. 
आरोग्य विभागातील साहित्य खरेदीबाबत विल्सन फार्माची निविदा पात्र असताना अतुलसिंह यांची भागीदारी असलेल्या एजन्सीची निविदा मंजूर करण्यात आल्याचा आरोप महाजन यांनी ऍड. शुचिता व अतुलसिंह हाडा यांच्यावर केला होता. त्यावर सभापतींनी त्यांना पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले. त्याबाबत महाजन यांनी लाचलुचपत विभागाकडे पत्र दिल्याचे सांगत अतुलसिंह हाडांवर दुसरा आरोप केला. वॉटरग्रेसच्या ठेक्‍यात पाच लाख घेतल्याचा दावा करत, त्यांचे कॉलरेकॉर्ड चौकशीची मागणी केली. त्याचे खंडन करताना ऍड. शुचिता यांनी महाजन यांनी पुन्हा निराधार व पुराव्याशिवाय आरोप केले. त्यांनी कोणत्याही विभागाकडून चौकशी करून घ्यावी, आम्ही सर्व चौकशीला तयार आहोत, असे म्हणाल्या. 

"प्री-बीड' बैठकीला अनुपस्थिती का? 
महाजनांनी त्यांच्या विल्सन फार्मा कंपनीची निविदा पात्र असल्याचा दावा केला होता. मग, या निविदा प्रक्रियेत आज "प्री-बीड' बैठक होती. या बैठकीला महाजन अथवा त्यांच्या एजन्सीच्या प्रतिनिधीने हजर राहणे अपेक्षित नव्हे तर आवश्‍यक होते. असे असताना ते बैठकीला का हजर राहिले नाही? असा प्रश्‍नही शुचिता यांनी "सकाळ'शी बोलताना उपस्थित केला.