ऐका हो ऐका...रस्तेदुरुस्तीसाठी बारा कोटींची तरतूद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

शहरातील सर्वच भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत नागरिकाच्या तक्रारी आल्या आहेत. विरोधकही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले होते. याबाबत आमदार भोळे यांच्याशी चर्चा केली

जळगाव : शहरातील प्रमुख रस्‍त्‍यांसह उपरस्‍त्‍यांची दुरावस्‍था झाली आहे. रस्‍त्‍यात खड्डे की खड्ड्यात रस्‍ते अशी स्‍थिती झाली आहे. परंतु या रस्‍ते दुरूस्‍तीसाठी बारा कोटी रूपयांची तरतुद करण्यात आल्‍याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.

शहरातील सर्वच भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत नागरिकाच्या तक्रारी आल्या आहेत. विरोधकही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले होते. याबाबत आमदार भोळे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, की शहरातील सर्व प्रभागांतील रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेतर्फे बारा कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागासाठी ५० लाख रुपये देण्यात येतील. त्यातून त्या प्रभागातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल. तसेच शिवाजीनगर आणि रिंग रोड भागात रस्त्यांची दुरवस्था अधिक असल्याने त्यासाठी अधिक रकमेची तरतूद स्वतंत्र करण्यात आली आहे. याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शहरतील विविध भागांतील विकासकामेही वेगाने सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

रस्त्यांच्या कामाला प्राधान्य 
शहरातील रस्त्याच्या प्रश्‍नाबाबत आमदार भोळे म्हणाले, की आगामी काळात प्रशस्त रस्ते करण्यावर भर असून, ४२ कोटींचा निधी रस्त्यांसाठी मिळविला. पण, त्यात प्रमुख रस्त्यांची कामे होऊ शकली. प्रामुख्याने नऊ मीटर आणि बारा मीटरचे रस्ते आम्ही घेतले. आता पुढच्या टप्प्यात कॉलन्यांमधील सहा मीटरचे रस्ते घेणार आहोत. निमखेडी रस्ता, शिवाजीनगर परिसरातील भारतनगर रस्ता आता घेतलेला आहे. सोबत रामेश्वर कॉलनीतील रस्ताही घेतलेला आहे. पिंप्राळा ते पिंप्राळा गेट या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. आगामी काळात लेआउट मंजूर करतानाच त्याच लेआउटमधील रस्ते लेआउटधारकाकडून करून घेतले जाणार आहे. काटेकोरपणे या बाबी करण्याकडे प्राधान्य देणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation damage road repair 12 carrore fund