जागा भाड्याने देणाऱ्या पाच दुकानदारांना दणका; मनपातर्फे दहा हजारांचा दंड

कैलास शिंदे
Thursday, 14 January 2021

काही दुकानदारच या अतिक्रमणधारकांकडून मोकळ्या जागेत सामान ठेवण्यासाठी भाडे घेत असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेने अशा पाच दुकानदारांवर कारवाई करून दंड आकारला. 
 

जळगाव : फुले मार्केटमधील दुकानदारासाठी असलेल्या जागेत दुसऱ्याच दुकानदारांना जागा देण्यात येत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणी तब्बल पाच दुकानदारांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 
फुले मार्केटमध्ये रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे ग्राहकांनाही त्रास होत आहे. महापालिकेने अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली असता, काही दुकानदारच या अतिक्रमणधारकांकडून मोकळ्या जागेत सामान ठेवण्यासाठी भाडे घेत असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेने अशा पाच दुकानदारांवर कारवाई करून दंड आकारला. 
याबाबत माहिती देताना उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले, की फुले मार्केटमध्ये होत असलेल्या अतिक्रमणाबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्याबाबत आपण कारवाई करीत आहोत. मात्र, त्या ठिकाणी काही दुकानदाराच अतिक्रमणधारकांना सामान ठेवण्यास जागा देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा दुकानदारांचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. त्यानंतर त्यांचे फोटो काढण्यात आले व त्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर त्यांचा लेखी खुलासा घेण्यात आला. संबंधित दुकानारांना दहा हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. 
 
पहिल्यांदाच कारवाई 
फुले मार्केटमधील दुकानदार आपल्या मोकळ्या जागेत अतिक्रमणधारकांना माल ठेवण्यास जागा देत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. मात्र, आजपर्यंत महापालिकेने कारवाई केली नव्हती. मात्र, आता महापालिकेने याबाबत दणका दिला आहे. 
 
महापालिकेतर्फे फुले मार्केटमधील दुकानदारांना त्यांच्या मोकळ्या जागेत केवळ त्यांच्याच दुकानाचे सामान ठेवता येईल. त्यांच्या जागेत दुसऱ्या दुकानाचे सामान किंवा दुसरे दुकान आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. 
-संतोष वाहुळे, उपायुक्त, महापालिका 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation five shop fined ten thousand