जळगाव महापालिकेत शिवसेनेच्या लढ्याला वरिष्ठांचा तडा! 

कैलास शिंदे
Thursday, 19 November 2020

जळगाव महापालिकेत सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील गटाची सत्ता होती. मात्र गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपविरुद्ध शिवसेना लढत झाली. यात शिवसेनेचा पराभव झाला व भाजपचा विजय झाला. ७५ पैकी भाजपचे तब्बल ५७ नगरसेवक निवडून आले,

जळगाव : ‘अरे आवाज कुणाचा... शिवसेनेचा’ अशी आरोळी दिली, तरी एक झंझावात दिसून येत होता. सत्तेला हादरा बसविण्याची ताकदही या घोषणेत होती. शिवसैनिकांच्या या घोषणेला वरिष्ठांचीही तेवढीच भरभक्कम साथ होती. राज्यातील सत्तेत शिवसेना आल्यानंतर शिवसैनिकांना अधिकच ताकद मिळेल, अशी आशा आहे. मात्र, जळगाव महापालिकेत सत्ताधारी भाजपसमोर लढताना विरोधी शिवसेना सदस्यांना पक्षश्रेष्ठींकडूनच बळ मिळत नसल्याने शिवसेनेचा विरोध थिटा पडत असल्याची स्थिती आहे. नेत्यांकडूनच पाठबळ नसल्याने नगरसेवकांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. 
जळगाव महापालिकेत सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील गटाची सत्ता होती. मात्र गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपविरुद्ध शिवसेना लढत झाली. यात शिवसेनेचा पराभव झाला व भाजपचा विजय झाला. ७५ पैकी भाजपचे तब्बल ५७ नगरसेवक निवडून आले, तर शिवसेनेला अवघ्या १५ जागा मिळाल्या. भाजप सत्तेत व शिवसेना विरोधात असे पालिकेचे चित्र निर्माण झाले. 

शिवसेनेचा विरोध 
भाजपने सत्ता स्वीकारल्यानंतर विरोधी शिवसेनेने निकराचा लढा सुरू केला. महापालिकेतील शिवसेना नेत्यांनी शहरातील विविध प्रश्‍नांवर भाजपवर आसूड ओढले. रस्त्यातील खड्डे, साफसफाईच्या प्रश्‍नावर सत्ताधाऱ्यांना महासभेत धारेवर ठरले तसेच आंदोलनेही केली. याच माध्यमातून शहरात पक्ष बळकट करण्याचा प्रयत्नही सुरू केला. 

राज्यात सत्ता पण... 
विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ता समीकरण बदलले... राज्यात शिवसेनेची सत्ता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर आली. भाजप विरोधी पक्षात बसला. राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला महापालिकेत विरेाधी पक्ष असलेल्या शिवसेनेला फायदा होईल, अशी अपेक्षा नगरसेवकांची होती. महापालिकेत भाजपने प्रभागाच्या कामासाठी सहकार्य केले नाही, तर राज्य सरकारकडून थेट निधी आणून शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात कामे करण्याचा मानस नगरसेवकांचा होता. मात्र, राज्यातील सत्तेचा महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांना फायदा होत नसल्याची कुजबूज नगरसेवकांत सुरू आहे. 

खडसेंकडे धाव 
भाजप विरोधी लढ्यासाठी वरिष्ठ नेत्याकडून आवश्‍यक ते बळ मिळत नसल्याचेही सांगण्यात येत आहे. महापालिकेतील भ्रष्टाचारविरोधी लढ्यासाठी भाजपतून राष्ट्रवादीत आलेले नेते एकनाथ खडसे यांच्याकडे महापालिकेतील नगरसेवकांना जावे लागले. याशिवाय राज्यातील एकाही शिवसेनेच्या मंत्र्याने जळगावचा दौरा केलेला नाही, शिवसेनेच्या नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांची अद्याप भेट घडविली नसल्याची तक्रार आहे. शिवसेना नगरसेवकांना प्रभागाच्या कामासाठी एक कोटी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हा निधीही अजूनही मिळालेला नाही. 

लढण्यासाठी ताकद नाही 
महापालिकेत भाजपची सत्ता आहे, जळगावात आमदारही आहेत. गिरीश महाजन नेतृत्व करीत आहेत. तसेच खासदारही भाजपचे आहेत. त्यामुळे महापालिकेत बलाढ्य असलेल्या भाजपशी लढा देण्यासाठी नगरसेवकांना ताकद देण्याची गरज आहे. मात्र आजच्या स्थितीत ती शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याकडून दिली जात नसल्याचीही तक्रार आहे. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत येतात आणि निघून जातात... पुढे कोणतेही काम होत नाही. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी मंत्री महापालिकेतील नगरसेवकांना पाठबळ देतील, अशी अपेक्षाही नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे. मात्र कोणतेही नगरसेवक खुलेपणाने बोलण्यास तयार नाहीत. 

शिवसेनेची अवस्‍था गंभीर
महापालिकेचे आयुक्तही विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेची दखल घेत नसल्याची तक्रार शिवसेनेच्या नगरसेवकांची आहे. प्रभागातील समस्यांबाबत तक्रार करण्यास गेल्यास आयुक्त शिवसेनेच्या नगरसेवकांशी संवादही साधत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी केली आहे. राज्यात सत्तेत व सत्तेचे नेतृत्वही मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेकडे असताना जळगाव महापालिकेत शिवसेनेची अवस्था निश्‍चितच गंभीर म्हणावी लागेल. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation sena not power full