याला म्‍हणतात घरचा आहेर..सत्‍ताधारी नगरसेविकेकडूनच आयुक्‍तांना घेराव

राजेश सोनवणे
Wednesday, 16 December 2020

महासभेसाठी महापालिका आयुक्त डॉ. सतीश कुळकर्णी महापालिकेत आले असतांना मनपातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका दिपमाला काळे यांनी आयुक्तांना घेरावा घातला.

जळगाव : महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेने घरचा आहेर दिला आहे. प्रभागातील अतिक्रमण काढण्यात प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आयुक्तांना घेरावा घातला. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे. 
महापालिकेची आज महासभा आयोजित करण्यात आली होती. कोरोनामुळे व्हर्च्युअल सभा घेण्यात येत आहे. महासभेसाठी महापालिका आयुक्त डॉ. सतीश कुळकर्णी महापालिकेत आले असतांना मनपातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका दिपमाला काळे यांनी आयुक्तांना घेरावा घातला. आयुक्त महापालिकेच्या प्रवेशव्दाराजवळ येताच आयुक्तांचा निषेध असो, अशा घोषणा देत त्यांचे वाहन अडविण्यात आले. यावेळी आयुक्त आपल्या वाहनातून खाली उतरल्यानंतर नगरसेविका काळे व त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणा दिल्या.

वर्षभरापासून पाठपुरवा; मनपावर ताशेरे
नगरसेविका दिपमाला काळे यांनी म्हटले आहे, गेल्या दहा वर्षापासून गणेश कॉलनी, ख्वॉजामिया दर्ग्यालगत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत आपण गेल्या वर्षभरापासून महापालिकेत पाठपुरावा करीत आहोत. याबाबत आयुक्त डॉ सतीष कुळकर्णी यांनाही आपण वेळोवळी निवेदन दिले आहे. मात्र महापालिकेचे प्रशासन त्याबाबत कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही. आपण नगरसेवक असतांनाही आपले म्हणणे ऐकले जात नाही. तसेच प्रशासनही कारवाई करण्याबाबत ढिम्म आहे. त्याचा निषेध म्हणून आपण आज आपण धरणे आंदोलन केले आहे. प्रभागातील जनतेनेही आपल्याला या आंदोलनात सहभाग घेतला आहे. याबाबत आयुक्तांनी त्वरीत कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation surrounding the commissioner by the ruling corporator