नगरसेवकाचे असेही दातृत्व; तरुणांना कोविड विम्याचे दिले कवच !

सचिन जोशी
Thursday, 17 September 2020

दिवस-रात्र एक करीत फिरले आणि त्यांना निवडून आणण्यात मोलाचे योगदान दिले. एरवी कोणत्याही निवडणुकीत उमेदवारासोबत फिरण्याआधी पैसा, पार्ट्यांचे गणित मांडले जाते.

जळगाव  : निवडणूक असो की सामाजिक कार्य; प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा लावून स्वत:ला झोकून देत सेवा देणाऱ्या दोन-अडीचशे तरुणांना कोविड विम्याचे कवच उपलब्ध करून देणारे आदर्श दातृत्व जळगावातून समोर आलेय. महापालिकेतील भाजपचे सदस्य तथा स्थायी समितीचे माजी सभापती जितेंद्र मराठे यांनी त्यांच्या अडीचशेवर मित्रांचा कोविड विमा काढून, त्यांना हे कवच उपलब्ध करून दिले आहे. 

जितेंद्र मराठे. शहरातील सामान्य कुटुंबातील होतकरू तरुण. सुरवातीपासूनच भारतीय जनता युवा मोर्चामध्ये सक्रिय. या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदची धुरा सक्षमपणे सांभाळल्यानंतर २०१८ च्या महापालिका निवडणुकीत त्यांना प्रभाग क्रमांक १३ मधून उमेदवारी मिळाली, ते निवडूनही आले आणि पहिल्याच ‘टर्म’च्या पहिल्याच वर्षात महापालिकेच्या महत्त्वपूर्ण स्थायी समितीचे सभापतीही झाले. 

मित्रांचा गोतावळा 
महापालिकेच्या आर्थिक स्थितीमुळे पदाधिकाऱ्यांनी शासकीय वाहन वापरू नये, असे ठरल्यानंतर जवळच्या मित्रानेच त्यांना त्याची गाडी वर्षभरासाठी उपलब्ध करून दिली. अगदीच सामान्य कुटुंबातून आलेले जितेंद्र यांच्या मित्रांचा गोतावळा फार मोठा. महापालिका निवडणुकीत अनेक मित्रांनी त्यांना प्रचार- प्रसाराबरोबरच आर्थिक मदतही केली. असा त्यांना जीव लावणारा त्यांचा गोतावळा. 

पार्ट्यांऐवजी काढला विमा 
निवडणूक काळात असे अनेक मित्र जितेंद्र मराठेंसोबत उभे राहिले, दिवस-रात्र एक करीत फिरले आणि त्यांना निवडून आणण्यात मोलाचे योगदान दिले. एरवी कोणत्याही निवडणुकीत उमेदवारासोबत फिरण्याआधी पैसा, पार्ट्यांचे गणित मांडले जाते. नंतर कार्यकर्ते दिसू लागतात. पण, मराठेंबाबत तसे झाले नाही. निवडणुकीच्या वेळी कुठलीही अपेक्षा न ठेवता मित्रांनी त्यांच्यासाठी काम केले. 

ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न 
कार्यकर्त्यांनी निवडणुकीवेळी, तसेच नंतरही दिलेली खंबीर साथ, त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून मराठेंना काहीतरी करायचे होते. कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना प्रभागात निर्जंतुकीकरण, नागरिकांचे सर्वेक्षण आदी कार्यातही त्यांच्या मित्रांनी सक्रिय सहभाग घेतला. अशात कुणी बाधित आढळला तर उपचार कसा होणार? या विचारातून मराठेंनी त्यांचा कोविड आरोग्य विमा काढण्याचे ठरविले. एकामागून एक अशा जवळपास अडीचशे तरुणांचा विमा त्यांनी काढला. सहा महिन्यांसाठीच्या या विम्यात दोन- अडीच लाखांपर्यंतचा खर्च कव्हर होतो. वाढत्या संसर्गात कुणाला बाधा झालीच, तर या विमा योजनेतून उपचार होणार आहे. नगरसेवकाच्या दूरदृष्टीचा हा खानदेशातील कदाचित पहिलाच उपक्रम असेल. 
 
बरेचसे मित्र आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. पण, अनेकांना आपल्या आरोग्याची चिंता नसते. त्या भावनेतून समाजसेवेत माझ्या बरोबरीने, किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त योगदान देणाऱ्या या मित्रपरिवाराचा विमा काढला आहे. 
- जितेंद्र मराठे, भाजप नगरसेवक, जळगाव 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporator protected the two hundred and fifty youths working in Kovid by taking out Kovid insurance